खारीकवाड्याचा विकास करणार; आ. जयंत पाटील यांचे ग्रामस्थांना आश्‍वासन

| मुरुड | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीमधील खारीकवाड्याचा विकास करणार, असे आश्‍वासन शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी ग्रामस्थांना दिले. खारीकवाडा ग्रामस्थांनी अरविंद शेडगे यांच्या नेतृत्वाखाली आ. पाटील यांची अलिबाग येथील शेतकरी भवनात भेट घेतली. यावेळी उसरोली ग्रामपंचायतीचे सरपंच मनीष नांदगावकर, नितेश भणगे, केतन मांदाडकर, जयेंद्र दिवेकर, विनोद मेस्त्री, मधुकर तांबोळी, विलास तळेकर आदी पंच कमिटी उपस्थित होती. शेतकरी कामगार पक्षाचे मुरुड तालुका चिटणीस मनोज भगत यांनी याबाबत पुढाकार घेत ग्रामस्थांची आ. जयंत पाटील यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी अरविंद शेडगे यांनी, खारीक वाडा येथील ग्रामस्थांची लोकसंख्या वाढत असून, मुलांना शिकण्यासाठी अंगणवाडी व जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीपर्यंतची शाळेसाठी याच ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावी. कारण, लहान मुलांना नांदगावमध्ये रहदारीच्या मुख्य रस्त्याला ओलांडून पलीकडे जात असताना वाढत्या वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. यावर आ. जयंत पाटील यांनी जागा उपलब्ध करून देणार असून, शाळा व अंगणवाडीसाठी इमारत होण्याकामी तात्काळ रायगड जिल्हा परिषदेकडून निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.

ग्रामस्थांनी खारीकवाडा येथील तलावाचे सुशोभिकरण तसेच समशानभूमी ग्रासमथांच्या नावावर व्हावी यासाठी आपले सहकार्य मिळावे, अशी विनंती केली. यावर आ. जयंत पाटील यांनी तलाव सुशोभिकरणासाठी माझ्या आमदार निधीतून हे काम पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. सातबार्‍यावर खारीकवाडा स्मशानभूमी असा उल्लेख होण्यासाठी लवकरच महसूल विभागाला पत्र देण्यात येणार असून, हेसुद्धा काम मार्गी लावणार असे आश्‍वासन दिले. खारीकवाडा ग्रामस्थांनी एकसंध राहून विकासाची कामे करून घ्यावी. शेतकरी कामगार पक्ष आपल्यासोबत असणार आहे. लवकरच मी खारीकवाडा गावाला भेट देईन, त्यावेळी विविध कामांचे भूमीपूजनही करेन. – आ. जयंत पाटील, सरचिटणीस, शेकाप

Exit mobile version