शेवटच्या घटकाला सक्षम करणार- आ. जयंत पाटील

| अलिबाग | प्रतिनिधी |

सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी, मच्छीमारांना बँकेमार्फत आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्याचा मानस आहे. पाच वर्षात वेगवेगळे उपक्रम राबविले जाणार आहेत. जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्था अद्ययावत करून त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही आ. जयंत पाटील यांनी दिली. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठक बुधवारी (दि.27) आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.


यावेळी नवनिर्वाचित उपाध्यक्ष सुरेश खैरे, माजी आ. पंडित पाटील, माजी आ. बाळाराम पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, नृपाल पाटील, महेश म्हात्रे, संतोष पाटील, तानाजी मते, प्रवीण लाले, पी.डी.पाटील, विजय गिदी, अजित कासार, गणेश मढवी, ज्ञानेश्वर भोईर, अस्लम राऊत, वसंत यादव, संतोष पाटील, हनुमान जगताप, एकनाथ गायकवाड, किसन उमटे, प्रिता चौलकर, मधुरा मलुष्टे, प्रदिप नाईक, जे.एम.म्हात्रे, शंकरराव म्हात्रे, सावतामाळी पतसंस्थेचे अध्यक्ष रमेश नाईक, गिरीश तुळपुळे, ॲड. परेश देशमुख, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, सहकारी संस्थाचे उपनिबंधक प्रमोद जगताप, श्रीकांत पाटील, जिल्ह्यातील पतसंस्थांचे, विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे पदाधिकारी, बँकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जयंत पाटील पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील बँकाच्या शाखांचे आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, अशा पध्दतीने बँकाचे कामकाज राहणार आहे. तीन वर्षात बँकेचा व्यवसाय दहा हजार कोटी तर बँकेचा स्वनिधी एक हजार कोटी करण्याचे उद्दीष्ट आहे. जिल्हा बँक देशातील सहकारी क्षेत्रातील विविध उपक्रम यशस्वीपणे राबविणारी रोल मॉडेल म्हणून प्रसिध्द आहे. तिचे कामकाज अधिक गतिमान करून बँक एक वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदीप जगे यांनी केले.

प्रायोगिक तत्वावर उभारणार गोदामे
दिवसेंदिवस हवामानात बदल होत आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. हा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी तसेच रायगड जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थांना आर्थिक बळ देण्यासाठी वेगवेगळे प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जाणार आहेत. पिकांचे संरक्षण करण्यासाठी पिक गोदाम उभे करण्याचा प्रयत्न आहे. त्यात सर्व सोयीसुविधा उपलब्ध असतील.
बाजार समित्यांवर शीतगृह बांधणार
मच्छिमार, शेतकऱ्याचा माल बाजारात योग्यवेळी, योग्य प्रमाणात पोहचत नसल्याने त्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील 15 बाजार समित्यांच्या ठिकाणी शीतगृहे बांधली जाणार आहेत. तळागाळातील शेतकरी, मच्छीमारांना त्याचा फायदा होईल.
सलग सहावेळा अध्यक्षपद
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने आपली सत्ता राखली आहे. नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक बुधवारी अलिबागमधील चेंढरे येथील रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात पार पडली. या बैठकीत संचालक मंडळाच्या अध्यक्षपदासाठी आ. जयंत पाटील व उपाध्यक्षपदासाठी सुरेश खैरे यांनी एकमेव अर्ज दाखल केल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे उपनिबंधक प्रमोद जगताप यांनी जाहिर केले. बँकेचे विद्यमान चेअरमन आ. जयंत पाटील 1986 पासून संचालक तर 1997 पासून चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. देशाच्या सहकारी क्षेत्रात तब्बल सहावेळा चेअरमनपदी निवडून येण्याचा हा एक विक्रम मानला जातो. तसेच सुरेश खैरे 2007 पासून उपाध्यक्ष आहेत.
शुभेच्छांचा वर्षाव
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी आ. जयंत पाटील व उपाध्यक्षपदी सुरेश खैरे यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या या निवडीनंतर आ. जयंत पाटील, सुरेश खैरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. राजकीय, सामाजिक, सहकार, शैक्षणिक आदी विविध क्षेत्रातील मंडळींनी प्रत्यक्ष भेटून आ. जयंत पाटील व सुरेश खैरे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. त्यानंतर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
लवकरच चित्र बदलणार
शिंदे गटातील आमदारांच्या पात्र, अपात्रतेची सुनावणी विधानसभेच्या अध्यक्षांच्या दालनात आहे. 13 ऑक्टोबरला यावर सुनावणी होणार आहे. अध्यक्ष नार्वेकर यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. या सुनावणीत वेळकाढूपणा केला जात आहे. मात्र लवकरच याबाबतचे चित्र बदलेल. लोकशाही, संविधान टिकविण्यासाठी इंडिया आघाडीमध्ये आम्ही सर्व पक्ष एकत्र आलो आहोत. यापुढील प्रत्येक निवडणूक ही इंडिया म्हणून लढविणार असून लोकसभा निवडणुकीसाठी शेकाप इच्छूक नाही. पक्ष बदलणाऱ्यांवर जनता नाराज आहे. येणाऱ्या निवडणुकीत त्यांना फटका बसणार आहे, असा विश्वास आ. जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच सुनील तटकरे रोज पक्ष बदलत असतात, असा शेराही त्यांनी मारला.
Exit mobile version