। अलिबाग । वार्ताहर ।
केवळ रायगडपुरतीच नव्हे तर जिथे जिथे शेकापचे पॉकेट आहे तिथे तिथे भविष्यात शेकापची ताकद वाढविण्याचा प्रयत्न करण्याचा निर्धार आ. श्यामसुंदर शिंदे यांनी केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मराठवाड्यातील कंधार मतदार संघातून शेकापचे उमेदवार निवडूण आणू,शिवाय मराठवाड्यातून किमान पाच ते सहा आमदार विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रशासकीय सेवेत असताना अनेकदा शेकापच्या आंदोलनास एक अधिकारी म्हणून सामोरे जाण्याचे प्रसंग आले आहेत. जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारा पक्ष अशीच या पक्षाची ओळख आहे ती आजपावेतो कायम आहे असेही ते म्हणाले.सिडकोसाठी जमिनी देणार्या शेतकर्यांना केवळ शेकापच्या आंदोलनामुळे साडेबारा टक्के विकसित भूखंड मिळाले असल्याचेही त्यांनी सांगितले. भविष्यात आ.जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची घोडदौड अशीच सुुरु ठेवण्याचा निर्धारही शिंदे यांनी व्यक्त केला. धैर्यशील पाटील यांनी केलेल्या अभ्यासपूर्ण भाषणाचे बाप से बेटा सवाई अशा शब्दात शिंदे यांनी मुक्तकंठाने कौतूक केले.