आगामी दौऱ्याबाबत कोचने स्पष्ट केली भूमिका
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
‘बाझबॉल’ (सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी) या मानसिकतेने कसोटी सामन्यातील आमचा पवित्रा बदलला आहे. भारताविरुद्धच्या आगामी कसोटी सामन्यांच्या मालिकेत निकाल काहीही लागला तरी आम्ही आमचा हा पवित्रा बदलणार नाही, असे ठाम मत इंग्लंड कसोटी संघाचे प्रशिक्षक ब्रँडन मॅकलम यांनी व्यक्त केले. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जानेवारीत भारतात येत आहे. शेस मालिका गमावल्यानंतर इंग्लंड संघासाठी फार मोठे आव्हान भारतात खेळताना असणार आहे. फिरकीस साथ देणाऱ्या खेळपट्ट्यांवर त्यांची पुन्हा एकदा अग्निपरीक्षा होणार आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये भारत बलवान संघ आहे आणि मायदेशात तर त्यांना हरवणे फारच कठीण असते, या संघाबरोबर आम्हाला पाच सामन्यांची मालिका खेळायची आहे, असे मॅकलम म्हणाले. ते आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या एका कार्यक्रमात बोलत होते. या मालिकेची मलाही फार उत्सुकता आहे, कारण एका सर्वोत्तम संघाविरुद्ध आमची अग्निपरीक्षा होणार आहे. कारण मायदेशात भारतीय संघाची ताकद अधिक वाढलेली असते. यात यश मिळाले तर फारच उत्तम असेल आणि पराभूत झालो तरी सन्मानाने आम्ही लढा देऊ, असे त्यांनी सांगितले; परंतु काहीही झाले तरी आक्रमक पवित्रा कायम ठेवणार याचेही संकेत दिले.
