भरमसाठ बिलांमुळे जनता मेटाकुटीला
| माणगाव | प्रतिनिधी |
स्मार्ट मीटरमुळे विजेचे बिल भरमसाठ येत आहे. सर्वसामान्य नागरिकांसह गोरगरीब जनता मेटाकुटीला आली आहे. महिन्याचा आर्थिक ताळमेळ बिघडू लागला आहे. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाने जनतेच्या प्रश्नासाठी आता रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. स्मार्ट मीटरविरोधात शेकाप जनआंदोलनाच्या पावित्र्यात आहे. येत्या काळात दक्षिण रायगडमध्ये पक्षातर्फे मोठा जनआंदोलन करणार असल्याची माहिती शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी माणगाव येथील पक्षाच्या बैठकीत बोलताना दिली.
शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्मार्ट मीटरच्या विषयासंदर्भात आगामी काळात दक्षिण रायगडात काढण्यात येणाऱ्या जनआंदोलनाच्या नियोजनासाठी माणगाव तालुका शेकापचे सभा मंगळवारी (दि.6) कृषी उत्पन्न बाजार समिती माणगाव येथील सभागृहात शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील व पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी समाजकल्याण सभापती अशोक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
स्मार्ट मीटर विरोधात कोणताही लोकप्रतिनिधी आवाज उठवत नसून केवळ आपल्या सर्वांचे नेते जयंत पाटील यांनी आवाज उठविला आहे. त्यांना ताकद देण्यासाठी आपण सर्वांनी तसेच वीज बिलांमुळे त्रस्त असणाऱ्या सर्व नागरिकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. दक्षिण रायगडात होणाऱ्या या स्मार्ट मीटर विरोधातील जनआंदोलनाला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सरकारला आपली ताकद दाखवून द्यायची आहे.
यावेळी चित्रलेखा पाटील पुढे म्हणाल्या की, आपला पक्ष हा गोरगरीब सर्व सामान्य जनता व कष्टकरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काम करीत आहे. आपल्या पक्षाकडे आजच्या घडीला मनुष्यबळ कमी असले तरी पक्षातील निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्ते आजही पक्षाशी एकनिष्ठ आहेत. माणगावमध्येही पक्षाचे कार्यकर्ते निष्ठेने पक्षाचे काम करत आहेत, याचा आनंद आहे. कमी कार्यकर्त्यातही पक्ष संघटना टिकवणे महत्वाचे असून मी पक्षातील कार्यकर्त्यांना लाल सलाम करते असे सांगून येत्या काळात दक्षिण रायगडमध्ये होणाऱ्या स्मार्ट मीटर विरोधातील जनआंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीला ज्येष्ठ नेते नानासाहेब सावंत, भाऊसाहेब सावंत, राज्य कामगार आघाडीचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक, जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, जिल्हा सरचिटणीस गौतम पाटील, महिला आघाडी अलिबाग तालुका अध्यक्षा नागेश्वरी हेमाडे, माणगाव तालुका चिटणीस सखाराम जाधव, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती महेश सुर्वे, जेष्ठ कार्यकर्ते हसनमिया बंदरकर, जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य राजेश कासारे, निजाम फोपळुणकर, चंद्रकांत सत्वे, रावसाहेब महाडिक, रामदास जाधव, युवा नेते स्वप्नील दसवते आदींसह तालुक्यातील पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार राजेश कासारे यांनी व्यक्त केले.
सरकारच्या काळात महिला सुरक्षित नाहीत केवळ लाडकी बहीण योजनेचा गवगवा हे सरकार करीत आहे. स्मार्ट मीटरमुळे गोरगरीब जनता पुरती हैराण झाली आहे. भरमसाठ येणाऱ्या वीज बिलांमुळे गरीब कुटुंबांचा महिन्याचा खर्चाचा बजेट कोलमडत आहे.
चित्रलेखा पाटील
शेकाप राज्य प्रवक्त्या






