माथेरान थंड हवेचे ठिकाण ही ओळख मिटणार की काय?

वाढत्या तापमानामुळे पर्यटकांसह स्थानिकांचे वाजले तीनतेरा!
। माथेरान । वार्ताहर ।
मुंबई-पुणे सारख्या शहरांना जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरान हे नेहमीच प्रिय राहिलेले आहे. निसर्गाचा आनंद घेता येणारे एकमेव ठिकाण असलेल्या माथेरानला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. गर्मीच्या काहिलीने बेजार झालेले नागरिक माथेरानला थंडाव्याच्या आडोशाला येत असतात. पण मागील काही वर्षांपासून माथेरानचा पारा चढला असून ह्यावर्षी तर प्रथमच माथेरानच्या तापमानाने 35 च्या वर उडी मारल्याने माथेरान थंड हवेचे ठिकाण ही ओळख मिटणार की काय? अशी भिती निर्माण झाली आहे.

1850 साली ब्रिटिशांनी घनदाट जंगलांनी व्यापलेल्या ह्या पर्वताचा शोध लावला. घनदाट जंगल, थंड हवा अशी या ठिकाणाची खरी ओळख. पण नागरिकांचा निसर्गावर सुरू असलेला अत्याचार, प्रचंड प्रमाणात सुरू असलेली वृक्षतोड, नवीन लागवडच नसल्याने घटत चाललेली वनसंपदा, घटत चाललेले पावसाचे प्रमाण व सलग दोन चक्रीवादळांचा तडाख्याने नेस्तनाबूत झालेली वृक्षवल्लीने येथील डोंगर माथा बोडका होत चालला असून त्यात भर म्हणून येथे वाढत असलेली घोड्यांची संख्या व त्यांच्या मलमूत्रामुळे नष्ट होणारी झुडुपे अशी अनेक कारणे समोर येत आहेत. पण ह्या निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी मात्र कोणतीही ठोस उपाययोजना मात्र लागू केली जात नसल्याने आगामी काळामध्ये थंड हवेचे ठिकाण अशी ओळखच पुसली जातेय की काय भीती समोर येऊ लागली आहे.

चक्रीवादळात माथेरानमध्ये शेकडो झाडे पडली आहेत. त्याचे अवशेष ही अजून ही पहावयास मिळतात. पण त्याविरुद्ध नवीन लागवड मात्र दिसून येत नाही. अनेक ठिकाणी जमिनीची धूप झाल्याने माती वाहून जात आहे व परिणामी झाडांची मुळे उघडी पडत आहेत त्याचेही संवर्धन होणे गरजेचे झाले आहे अशा प्रकारची अनेक कारणे समोर येत आहेत. नागरिकच निसर्गाला ओरबडत असल्याने येणार्‍या पिढीसाठी मात्र माथेरानची थंड हवा राहील की नाही अशी शंका येऊ लागली असून स्वतःचा व्यवसाय व माथेरानची खरी ओळख टिकवायची असेल तर आता नागरिकांनी पुढाकार घेऊन वनसंवर्धनाचे महत्व लक्षात घेऊन शासनाचे गंभीररित्या लक्ष वेधण्याची गरज निर्माण झाली आहे.

Exit mobile version