सह्याद्रीवर कुऱ्हाडीचा घाव सहन करणार नाही – चित्रलेखा पाटील

टोरंट प्रकल्पासाठी होणाऱ्या वृक्षतोडीविरोधात एल्गार; निसर्गाच्या रक्षणासाठी लढा तीव्र करण्याचा निर्धार

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

सह्याद्री हा केवळ डोंगरांचा प्रदेश नसून महाराष्ट्राचा नैसर्गिक वारसा आणि अस्मिता आहे. या सह्याद्रीवर कुऱ्हाड चालवून जंगलसंपत्ती उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त करत शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी टोरंट पॉवरच्या प्रस्तावित जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पासाठी होणाऱ्या वृक्षतोडीविरोधात आवाज बुलंद केला. कर्जत येथे आयोजित सभेत त्या बोलत होत्या.


भीमा शंकर परिसर हा रायगड जिल्ह्याची शान आहे. ॲमेझोन जसं जगाच श्वास मानले जाते, त्या पद्धतीने हा परिसर रायगड जिल्ह्याचा श्वास आहे. एका दिवसात हजारो झाडांची कत्तल प्रकल्पाच्या नावाखाली केली जाते, ही गंभीर बाब आहे. प्रकल्पाला विरोध नाही. मात्र, होणारी निसर्गाची हानी टाळण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. कर्जत परिसरातील टोरंट प्रकल्पामुळे पर्यावरणावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड आणि वनक्षेत्राच्या वापराचा प्रश्न उपस्थित होत असून, त्याविरोधात पर्यावरणप्रेमी, स्थानिक नागरिक आणि विविध संघटना एकवटत आहेत. याच पार्श्वभूमीवर चित्रलेखा पाटील यांनी सह्याद्रीच्या संरक्षणाची भूमिका ठामपणे मांडली. सह्याद्रीवर कुऱ्हाडीचा घाव घालून येथील झाडे तोडण्याचे काम केले जात आहे . सह्याद्रीवर कुऱ्हाडीचा घाव घालत असाल तर ते कदापी सहन केले जाणार नाही., असा इशारा शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी दिला.


यापुढे मार्गदर्शन करताना चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, हा लढा सोपा नाही. हा लढा स्मार्ट मीटरला जोडणारा आहे. महाग वीज विकून त्याची वसूली सर्वसामान्यांकडून करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे कर्जतसह जिल्ह्यातील नागरिकांना जागृत राहण्याची गरज आहे. भीमाशंकर परिसर, डोंगर भाग निसर्गाच्या सानिध्यात आहे. या सह्याद्रीवर कुऱ्हाडीचा घाव घालून येथील झाडे तोडण्याचे काम केले जात आहे. कोणत्याही प्रकारची निविदा न काढता, परस्पर या ठिकाणी प्रकल्प आणण्याचा घाट सुरु आहे. रायगड जिल्ह्यात शेकाप आणि समविचार पक्षाची एक वेगळी भूमिका आहे. वृक्षतोड करून जर टोरंट सारखे प्रकल्प येणार असतील तर असे प्रकल्प हाटविल्याशिवाय राहणार नाही. निसर्ग नष्ट करण्याचे काम हे सरकार करीत आहे. शेतकरी कामगार पक्ष हे कदापी सहन करणार नाही. कार्पोरेट खोती होऊ देणार नाही. आम्ही सत्तेत नसलो तरी या भागातील वनसंपदा वाचविण्यासाठी आणि येथील नागरिकांच्या सुरक्षेसाठी तीव्र लढा देण्याची क्षमता आमच्यात आहे. हवा, पाणी हा सर्वसामान्यांचा मुलभूत हक्क आहे. विकासाच्या नावाखाली होणारी लुट थांबविण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष येथील झाडांच्या व नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. अठरा दिवसात या प्रकल्पासाठी मंजूरी देण्याचे काम केले जाते. मात्र, येथील स्थानिकांना रस्ता, घरे बांधण्याची परवानगी देण्यासाठी वर्षानुवर्षे फेऱ्या मारण्यास लावल्या जातात, ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे सरकारने वेठीस धरून हा प्रकल्प जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न केला तर शेकाप स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी दिला.

Exit mobile version