| मुंबई | प्रतिनिधी |
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केलेल्या विधानानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही असा काही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. अध्यक्षपदाच्या गोंधळानंतर आता शेवटी पीयूष गोयल यांनीही स्पष्टीकरण दिले आहे. तसेच, चुकीच्या माहितीसाठी दिलगिरी देखील व्यक्त केली आहे.
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी एका मुलाखतीत म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा भाग असून त्यांची कामगिरी उत्तम आहे. राष्ट्रवादीचे नेतृत्व आधी अजित पवारांसोबत होते, आता सुनेत्रा पवारांसोबत आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शरद पवारांना राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी आमंत्रण दिले जाईल याची शक्यता कमी आहे. त्यांनी जनतेचा विश्वास गमावला आहे. पिंपरी चिंचवडमद्ये त्यांचा सुपडा साफ झाल्याचे दिसून आले आहे. अजितदादा महायुतीसोबत असते तर पुणे-पिंपरी चिंचवडच्या विजयाचा ते भाग असते, असे ते म्हणाले होते. त्यावर राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनीही स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, अध्यक्षपदाबाबतच्या बातम्या निराधार असून चुकीच्या आहेत. राष्ट्रवादी हा लोकशाही मूल्यांवर आधारित पक्ष असून इतक्या महत्त्वाच्या पदासाठी कोणताच निर्णय घाईने घेतला जाणार नाही. पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल. त्यांच्या भावनांचा आदर करूनच पुढील निर्णय घेण्यात येईल, असे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे. त्यावर पीयूष गोयल म्हणाले की, एका वरिष्ठ पत्रकाराने मला चुकीची माहिती दिली होती की प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. मी त्याची खात्री न करता विधान केले. परंतु, त्यानंतर मला ते चुकीचे असल्याचे समजले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. चुकीची माहिती दिल्याने मी खेद व्यक्त करतो, असेही पीयूष गोयल म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष ‘पटेल’?
