जनतेचे प्रश्‍न मार्गी लावणार: अनंत गीते

| माणगांव | वृत्तसंस्था |

मी तालुक्यातील औद्योगिक क्षेत्राकडे लक्ष दिले नाही. पण आता खासदार झाल्यावर महाड, विळे भागड औद्योगिक क्षेत्रात असणारे सर्व प्रश्‍न मार्गी लावेन असे प्रतिपादन इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी निजामपूर येथे झालेल्या प्रचार सभेत केले. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार व इतर मित्र पक्ष इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ निजामपूर येथील ग. रा. मेथा विद्यालयातील सभागृहात (दि.27) रोजी प्रचार सभा पार पडली. यावेळी जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, नगराध्यक्षा स्नेहल जगताप, तालुकाप्रमुख गजानन अधिकारी, महिला तालुकाप्रमुख म्हामुनकर, ऍड. ठाकूर, बळीराम घाग, उपतालुका प्रमुख चंद्रकांत पवार, विभागप्रमुख महालुंगे, जनार्दन मानकर, धनाजी देशमुख प्रभाकर मानकर, सोनावणे, संजय साखरे, विश्‍वनाथ कामेरकर आदी इंडिया आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी गीते पूढे म्हणाले की, विविधता व एकताने सुखी नांदत असलेल्या देशात या सरकारने नख लावलेला आहे. मोदींमुळे देश हुकूमशाहीकडे वळत आहे. गेली 45 वर्ष मी राजकारणात सक्रिय आहे. शाखाप्रमुख ते खासदार असा माझा प्रवास असून सुद्धा माझ्यावर एक ही डाग व भ्रष्टाचाराचा आरोप नाही. मला कसलीही हाव नाही. परमेश्‍वराने मला भरपूर काही दिलंय. ही निवडणूक जनतेने हातात घेतली असून जनता आता मोदींना तडीपार करणार आहे. तुमचं एक मत खूप महत्त्वाचं असून तुमच्या एका मतामुळे मी खासदार होईन व माझ्या एका मतामुळे इंडिया आघाडीचा पंतप्रधान होणार आहे. येथील आदिवासी बांधव ज्या जागेत राहतात तिथे मोठ्या प्रमाणात खनिज आहे. त्या जागा भाजप सरकार बळजबरीने आपल्या ताब्यात घेत असून त्यांना त्या अडाणीला द्यायच्या आहेत.

आदिवासी बांधवांना इथून हद्दपार करायचा त्यांचा कट आहे. ह्या निवडणुकीत खूप पैसा खर्च केला जात आहे. पण मला जनतेवर विश्‍वास आहे. जनता कधीच पापाच्या व शापाच्या पैशाला हात लावणार नाही. निजामपूर विभाग कोणाची मक्तेदारी नाही. निजामपूरचा सात-बारा कोणाच्या नावावर लिहलेला नाही. मला ईडी, सीबीआयची भीती वाटत नाही. भीती वाटते तर ती जनतेची आपल्या देशात लोकशाही आहे. राज्यकर्त्यांनी जनतेला घाबरून राहायला पाहिजे या उलट या राज्यकर्त्यानमुळे जनता घाबरलेली दिसत आहे. त्यामुळे जनता माझ्या सोबत असून माझा विजय निश्‍चित आहे, असा विश्‍वास यावेळी अनंत गीतेंनी व्यक्त केला. यावेळी स्नेहल जगताप म्हणाल्या की, विरोधक मटण वड्यांच जेवण ठेऊन लोक जमवत आहेत. त्या शिवाय त्यांची लोक सुद्धा जमत नाहीत. तुम्ही मोदींसाठी मतदान मागत आहेत. पण स्वतः साठी मत मागायला काय झालं, असा सवाल देखील यावेळी जगताप यांनी उपस्थित केला.

Exit mobile version