लालपरी धावणार का?

प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन गेली 7 दशके महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात धावणारी, ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असणारी एसटी अर्थात सर्वांची लाडकी लालपरी गेले सव्वा चार महिने राज्याच्या सर्वच आगारात एकाच जागी उभी आहे. ती सुरु केव्हा होणार याचीच प्रतीक्षा आता सर्वसामान्यांना लागलेली आहे. कारण विलिनीकरण या एकाच मागणीवरुन एसटी कर्मचारी संघटना गेल्या 125 दिवसांपासून संपावर गेलेल्या आहेत. त्या संपावर अपेक्षित तोडगा काढण्यात राज्यकर्त्यांना सातत्याने अपयश येत आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर अधिकृत भाष्य करण्यास अथवा ठोस निर्णय घेण्यास राज्यकर्ते कचरत आहेत. त्यामुळे हा तिढा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मंगळवारी याबाबत होणारी सुनावणी आता शुक्रवारी होणार आहे. या सुनावणीत विलिनीकरणाबाबत नेमलेल्या समितीच्या अहवालावर न्यायालय निकाल जाहीर करणार आहे. हा निर्णय सर्वसामान्यांना दिलासा देणारा ठरावा, एवढीच अपेक्षा. एसटीचे लाखो प्रवासी बाळगून आहेत.कारण एसटी बंद असल्याने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा गावगाडाच रुतून बसलाय, जोपर्यंत लालपरी राज्याच्या कानाकोपर्‍यात धावत होती तोपर्यंत गावगाडा सुरळीत सुरु होता. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी दररोज एसटीच्या वेळेत शाळा, महाविद्यालयांना सुखरुप जात होते.सरकारी, खाजगी नोकरदारही आपापल्या कार्यालयांमध्ये नियमित उपस्थित रहात होते. पण लालपरी बंद झाली आणि सारे गणितच कोलमडून गेले. कारण एसटीवर अवलंबून असलेल्या सर्वानाच आपला मार्ग बदलावा लागला. शाळा, महाविद्यालये, सरकारी, खाजगी नोकरदारांना खाजगी वाहनांचा आधार घेत कसेबसे धडपडत कार्यालयांमध्ये पोहोचावे लागत आहे. यामध्ये एसटी कर्मचार्‍यांच्या मुलांचाही समावेश आहे.सध्या तर दहावी, बारावीच्या परीक्षांच कालावधी आहे.परीक्षा देण्यासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांना तर एसटीचा मोठा आधार होता. पण आता तोच आधार नाहीसा झालेला आहे. संप आज मिटेल, उद्या मिटेल या आशेवर सारेजण बघत होते पण कधी नव्हे ते एसटी कर्मचारीही इरेल पेटल्यासारखे विलिनीकरण झाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही या भूमिकेवरच अडल्याने हा तिढा आणखी वाढत राहिला.आता मात्र एसटी कर्मचारी आणि राज्यकर्ते यांचा सर्वसामान्यांना तिरस्कार वाटू लागला आहे. कारण एसटी स्थापनेपासून सव्वाशे दिवस चाललेला हा पहिलाच संप ठरल्याने त्याची मोठी झळ सर्वसामान्यांसह एसटी महामंडळ आणि राज्य सरकारलाही बसला आहे. संपामुळे एसटीचे सुमारे 2000 कोटींचे नुकसान झालेले आहे. त्यात लॉकडाऊन काळात तर एसटीचे चाक पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेले होते. त्यातून सावरत असतानाच या संपाचा मोठा फटका बसला आहे. आधीच तोट्यात चाललेल्या या महामंडळाला हा तोटा भविष्यात भरुन काढताना नाकी दम येणार आहे. जे संपावर आहेत त्यांची अवस्थाही आज देशोधडीला लागल्यासारखी झालेली आहे.गेले चार महिने संपावर गेलेल्या कर्मचार्‍यांना वेतन मिळालेले नाही. आधीच पोटाला चिमटा काढून जीवन जगणार्‍या एसटी कर्मचार्‍यांची आर्थिक स्थिती बेताचीच आहे. त्यात या संपामुळे तर आर्थिक घडीच विस्कटलेली आहे. सरकारने तर हजारो कर्मचार्‍यांना नोकरीतून बडतर्फच करुन टाकलेले आहे. तर रोजंदारीवरील कर्मचार्‍यांची सेवाच संपुष्टात आलेली आहे. याचा त्रास या सर्वांनाच बसत आहे. पण विलिनीकरण या एकाच मागणीवर घोडे अडल्याने संप मिटायला तयार नाही.हे कुठेतरी थांबले पाहिजे अशीच सर्वसामान्यांची मनापासून अपेक्षा आहे. जे झाले ते गंगेला मिळावे या भूमिकेतून एसटी.कर्मचारी संघटना आणि सरकारनेही दोन पाऊले  मागे, पुढे करीत सर्वसामान्यांना होणारा त्रास कमी व्हावा या एकाच हेतूने संपाबाबत अपेक्षित तोडगा काढणे योग्य ठरणार आहे.सरकारने कर्मचार्‍यांना वाढीव पगारासह अन्य सुविधा देण्याचे आश्‍वासित केलेले आहे.जे कर्मचारी कामावर रुजू झालेले आहेत त्यांना या वाढीव वेतनवाढीचा फायदाही झालेला आहे.त्याकडेही कर्मचार्‍यांनी पहाणे इष्ट ठरेल. शेवटी सरकार आणि सरकारी यंत्रणेत काम करणारी मंडळी ही विकासाची दोन चाके आहेत. ही चाकेच रुतून बसली तर विकास साध्य होणार नाही.प्रवाशांच्या सेवेसाठी असणारी लालपरीच जर आगारात राहिली तर प्रवाशांची सेवा घडणारच नाही. उलट प्रवाशांच्या बिनसेवेसाठी हे ब्रीद वाक्य एसटीसाठी वापरावे लागेल.

Exit mobile version