ना.आदिती तटकरे कोणती कृती करणार याकडे सर्वांचे लक्ष
। उरण । विशेष प्रतिनिधी ।
उरण तालुका म्हणजे कणगाभर प्रकल्प आणि शेकडो खंडीभर समस्या असे उरण तालुक्याचे चित्र असताना यातून आघाडी सरकारच्या काळात कोव्हिड सेंटर, काही कंपन्यांचे कामगारांचा प्रश्न आणि दिघोडे सारख्या ठिकाणी आरोग्य केंद्र उघडणे या व्यतिरिक्त प्रत्यक्ष जनतेला भेडसावणार्या समस्या आणि त्यांचे निराकरण करण्यात आघाडीचे सरकार मात्र सपशेल अपयशीच ठरत आले आहे. या पार्श्वभूमीवर उद्याच्या सोमवारी उरणमध्ये तळ ठोकणार्या पालकमंत्री उरणकारांच्या मुख्य समस्येवर काही ठोस उपाय शोधणार का हे पाहावे लागणार आहे.
उरण तालुक्याला भला मोठा समुद्र किनारा लाभला आहे. या किनार्याच्या एका बाजूला सिडकोने समुद्रा पासून संरक्षण करण्याच्या हेतूने पागोटे जंक्शन ते करंजा पर्यंत पक्क्या स्वरूपाचा रस्ता केलेला असल्याने या भागात समुद्री पाणी शिरण्याचा धोका टळला आहे. मात्र उरणच्या पूर्व भागातील खोपटे ते आवरे गावापर्यंतच्या समुद्री किनारी भागात बंधाराच शिल्लक राहिलेला नसल्याने समुद्राचे ठोक पाणी या भागातील हजारो एकर भातशेतीत शिरून त्या सर्व शेतीची नासाडी झाली आहे. त्यातूनच एकेकाळी भाताचे कोठार असलेला उरण पूर्व भागात आता नागरिकांना खायला पुरेल एवढाही भात पिकेनासा झाला आहे. त्यावर उपाय म्हणून खोपटा गाव ते गोवठणे मार्गे आवरे या भागात पक्क्या स्वरूपाचा रस्ता होण्याची गरज आहे. तसे निवेदन या भागातील नागरिकांनी सातत्याने प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींना दिलेले आहे. मात्र शेतकर्यांच्या या व्यथेवर कोणाचेही लक्ष नसल्याची बाब शेतकर्यांना सलत आहे त्यावर पालकमंत्री आदिती तटकरे काही फुंकर घालणार की केवळ रोहा श्रीवर्धनलाच सारी विकासकामे घेऊन जाणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील आणि पापकमंत्री व त्यांची पक्षाची सर्व टीम सोमवारी उरणमध्ये येणार आहे. त्या संवादातून शेतकर्यांना अपेक्षित असलेल्या या कामांचा संवाद घडतो का हे पहावे लागणार आहे. उरण शहराला लागून असलेल्या सर्व जमिनी अजूनही सेफ्टी झोनमध्ये आहेत. काहींनी टिचकी वाजवून सेफ्टी झोनच विशय दोन महिन्यात सोडविण्याचे वाफारे दोन – अडीच वर्षांपूर्वी सोडले होते. प्रत्यक्षात मात्र आजही हा सेफ्टी झोनचा विषय सुटलेलाच नाही त्यावर पालकमंत्री काही भाष्य करणार का असा सवाल या ठिकाणी विचारला जात आहे. उरणकरांना आता नव्याने सिडको अजिबात नको आहे अशा स्थितीत सिडको पुन्हा एकदा लॉजीस्टिक पार्क आणि खोपटे नवे शहरच्या माध्यमातून उरणच्या पूर्व व उत्तर भागात शिरू पाहत आहे. ज्याला जनतेचा कडवा विरोध आहे. त्यावर शासन म्हणून सिडकोला थांबविण्याची कृती घडणे अपेक्षित असतांना सिडको मात्र शेतकर्यांना भूमिहीन करण्याचे मनसुबे आखत आहे. त्यातून शासनच शेतकर्यांवर सिडको लादत असल्याचा प्रचार होत असल्याने शासनाची प्रतिमा जनमानसामध्ये मलिन होत आहे. त्याबाबत पालकमंत्री आत्ता काय घोषणा करतात का याकडे शेतकर्यांच्या नजरा लागल्या आहेत. उरण तालुक्यातील सिडकोच्या जमिनींवर वसलेले अनेक प्रकल्प आत्ता हळू हळू बंद पडू लागले असून त्यातून बेरोजगारीचा राक्षस उरण तालुक्याला गिळू पाहत आहे. त्यावर इलाज म्हणून खोपटे ते आवरे या समुद्र किनारी भागातील जमिमींवर अत्याधुनिक एम आय डी सी सारखा प्रकल्प आल्यास एका दगडात दोन पक्षी मारता येतील मात्र हे करून घेण्याची मानसिकता लोकप्रतिनिधी राजकीय पक्ष आणि प्रशासकीय अधिकारी वर्गाची असणे गरजेचे आहे त्यावरही पालकमंत्री काही भाष्य करतात का हे पाहणे औत्सुक्याचे झाले आहे.
खोपटे-चिरनेर ते दोघाडे मार्गे गव्हाण फाटा या परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा कंटेनर यार्डाचे पीक आले आहे. अशा यार्डांनी आपल्या प्रकल्पाच्या पाठीमागे असणार्या शेतीत जाण्यासाठी किमान सोळा फुटांचा रस्ता ठेवण्याची अपेक्षित आहे मात्र त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले असल्याचे तालुक्यात दिसत आहे. हे सर्व कंटेनर यार्ड शासनाला दंडाच्या रूपाने कोट्यावधींचा महसूल जरी देत असले तरीही स्थानिकांच्या शेतीची मात्र वाट लागली आहे. त्याबाबत पालकमंत्री काही ठोस पावले उचलणार का हा खरा प्रश्न आहे. एकूणच समस्यांच्या गर्तेत असलेल्या उरण तालुक्यातील कोणत्या समस्यांवर पालकमंत्री ठोस अशी भूमिका घेऊन त्यातून मार्ग काढतात याकडे उरणकरांच्या नजरा लागल्या आहेत.
समस्येच्या गर्तेत असणार्या उरणला पालकमंत्री सावरणार का?
