| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल आणि नवी मुंबईतील वाहतुकीचा सर्वाधिक ताण असलेल्या कळंबोली सर्कलवरील वाहतूककोंडी दूर करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या उड्डाणपुलाच्या कामाला वेग आला आहे. विविध यंत्रसामग्रीच्या साहाय्याने बांधकाम युद्धपातळीवर सुरू असून, या प्रकल्पाच्या पूर्णत्वाकडे वाहनचालकांचे लक्ष लागले आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील विद्यमान उड्डाणपुलाच्या वरून नव्या पुलाची जोडणी होणार असल्याने या परिसरातील वाहतूक व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल अपेक्षित आहेत.
कळंबोली सर्कल हे मुंबई, पुणे, ठाणे, पनवेल, जेएनपीए आणि गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी महत्त्वाचे जंक्शन आहे. दररोज हजारो कंटेनर, अवजड ट्रक, खासगी वाहने आणि एसटी बसची या मार्गावरून वर्दळ असते. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग, जेएनपीए मार्ग आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारी वाहने याच परिसरातून मार्गक्रमण करतात. त्यामुळे विशेषतः सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. अनेकदा काही किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठीही वाहनचालकांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागते.
नव्या उड्डाणपुलामुळे विविध महत्त्वाच्या मार्गांवरील वाहतुकीला अधिक सुलभ जोडणी मिळण्याची अपेक्षा आहे. जेएनपीए बंदराकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसह विमानतळाकडे जाणारे प्रवासी आणि मुंबई-गोवा महामार्गावरील वाहनचालकांसाठी हा पूल उपयुक्त ठरणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पुलाच्या वरून होणारी जोडणी हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य मानले जात आहे. सध्या कळंबोली सर्कलवर अनेक दिशांनी येणाऱ्या वाहनांची एकाच ठिकाणी गर्दी होत असल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पनवेल आणि परिसरातील वाहतुकीत भविष्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जेएनपीए बंदरातील अवजड वाहनांची वर्दळ आणि मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक लक्षात घेता कळंबोली सर्कलवरील हा उड्डाणपूल महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. त्यामुळे कामाचा वेग कायम ठेवून सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजनांसह हा प्रकल्प लवकर पूर्ण करावा, अशी अपेक्षा वाहनचालक आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
प्रवासाचा वेळ वाचणार
नव्या पुलामुळे वाहनांना अधिक सुलभ मार्ग उपलब्ध झाल्यास सर्कलवरील वाहतुकीचा ताण विभागला जाण्यास मदत होईल. परिणामी, प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होण्याची शक्यता आहे. विशेषतः जेएनपीए बंदरातील कंटेनर वाहतूक आणि विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होऊ शकतो.
