विम्बल्डन टेनिस स्पर्धा; पेगुला, रुब्लेव्ह उपांत्यपूर्व फेरीत

| लंडन | वृत्तसंस्था |

अमेरिकेच्या चौथ्या मानांकित जेसिका पेगुला आणि चेक प्रजासत्ताकच्या मार्केटा वोंड्रोउसोवा यांनी आपापल्या सामन्यात विजय मिळवत विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरुषांत सातव्या मानांकित आंद्रे रुब्लेव्ह, इटलीचा आठवा मानांकित यानिक सेन्नेर यांची उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. डेन्मार्कचा होल्गर रुन, आणि बुल्गारियाचा ग्रिगोर दिमोत्रोव्ह यांनीही विजय नोंदवले.

महिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात पेगुलाने युक्रेनच्या लेसिया सुरेन्कोवर 6-1, 6-3 असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीपासून आक्रमक खेळ करणार्‍या पेगुलाने सुरेन्कोला पुनरागमन करण्याची कोणतीच संधी दिली नाही. याच फेरीतील अन्य सामन्यात वोंड्रोउसोवाने आपल्याच देशाच्या मेरी बोझकोव्हाला 2-6, 6-4, 6-3 असे पराभूत केले. सामन्यातील पहिला सेट गमावल्यानंतर वोंड्रोउसोवाने दुसर्‍या सेटमध्ये जोरदार पुनरागमन करताना सामना बरोबरीत आणला. तिसर्‍या सेटमध्येही तिने आपली हीच लय कायम राखत विजय नोंदवला. तिसर्‍या फेरीतील सामन्यात कझाकस्तानच्या एलिना रायबाकिनाने ब्रिटनच्या कॅटी बाऊल्टरचा 6-1, 6-1 असा पराभव केला. तर, बिगरमानांकित मिरा अँड्रीवाने अनास्तासिया पोटापोव्हाला 6-2, 7-5 असे नमवले. पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात रुब्लेव्हने कझाकस्तानच्या अ‍ॅलेक्झांडर बुबलिकला चुरशीच्या लढतीत 7-5, 6-3, 6-7 (6-8), 6-7 (5-7), 6-4 असे पराभूत केले. तर, सिन्नेरने कोलंबियाच्या डॅनिएल एलाही गलानला 7-6 (7-4), 6-4, 6-3 असे नमवले. अन्य सामन्यात, रुनने स्पेनच्या अलेहांद्रो डाविडोविच फोकिनावर पाच सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत 6-3, 4-6, 3-6, 6-4, 7-6 (10-8) असा विजय मिळवला. तर, दिमित्रोव्हने अमेरिकेच्या दहाव्या मानांकित फ्रान्सिस टियाफोला 6-2, 6-3,6-2 असे पराभूत करत चौथी फेरी गाठली.

Exit mobile version