। माणगाव । प्रतिनिधी ।
लाईट बिलाच्या वादावरून सख्या भावावर कोयत्याने वार करून त्याला जखमी केल्याप्रकरणी आरोपी भावावर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची घटना शुक्रवार दि.27 मे 2022 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास माणगाव तालुक्यातील नवे रवाळजे गावात फिर्यादी व आरोपी यांच्या घराच्या पडवीत घडली.याबाबतची फिर्याद प्रमोद लक्ष्मण मोरे (वय-34) रा. नवे रवाळजे ता.माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
प्रमोद लक्ष्मण मोरे व सुरेश लक्ष्मण मोरे (वय-40) रा.नवे रवाळजे ता.माणगाव हे नात्याने सख्खे भाऊ असून ते वडिलोपार्जित घरात वेगवेगळ्या रूममध्ये राहत असून सदर दोन्ही रूमला एक सामायिक लाईटचे मीटर आहे. सहा महिन्यापूर्वीचे थकबाकी लाईटबील हे प्रमोद मोरे याने एकट्याने भरलेले असून आता आलेले लाईट बिल 1600 रुपये यापैकी 800 रुपये फिर्यादी यांचा भाऊ सुरेश मोरे याने अर्धी रक्कम भरणा केली म्हणून वायरमन हे लाईट कनेक्शन बंद करण्याकरिता आले असल्याने हे पत्नीकडून समजल्याने प्रमोद हे घरात बडबड करीत असताना पुतण्या आयुष सुरेश मोरे हा पडवीत आल्यावर त्यास विचारणा केली त्याने प्रमोद यास उलट उत्तर दिल्याने याची कॉलर पकडली.हा प्रकार आयुषने वडिल सुरेश मोरे यांना सांगितला.त्यानी रागाच्या भरात सांगितल्यावर घरात असलेला लोखंडी कोयता घेऊन शिवीगाळी करीत फिर्यादी यास ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने फिर्यादीच्या दोन्ही हातावर वार करून फिर्यादीला गंभीर स्वरूपाच्या दुखापती करून जखमी केले. गुन्ह्याच्या तपास पोलीस उपनिरीक्षक श्री.आघाव हे करीत आहेत.






