पिस्तूल घेऊन ‘तो’ उरणमध्ये फिरत होता….

| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील न्हावाशेवा येथे अजय सरपटा या तरुणास अवैध पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. आरोनी वहाळ येथील रहिवासी असून शस्त्र विक्रीसाठी तो आला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल व दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

न्हावाशेवा येथील स्मशानभूमी परिसरात एकजण अग्निशस्त्र घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून वरिष्ठ निरीक्षक संजीव धुमाळ यांनी उपनिरीक्षक नितीन सांगळे, हवालदार महेंद्रसिंग राजपूत, शिवाजी बसरे, संजय सकपाळ, विशाल हिंदोळा यांचे पथक तयार केले होते. या पथकाने सोमवारी रात्री स्मशानभूमी परिसरात सापळा रचला. त्याठिकाणी एकजण आला असता त्याला ताब्यात घेऊन झडती घेण्यात आली.

यावेळी त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे आढळून आली. याबाबत चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. याप्रकरणी अजय सरपटा याच्यावर न्हावाशेवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. तो पनवेलच्या वहाळ येथे राहणारा असून शस्त्र विक्रीसाठी आला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version