बहावा, निवडुंग, गुलमोहर आदी वृक्षांना बहर
| माणगाव | प्रतिनिधी |
मार्च महिन्यात उन्हाचा पारा चढत असताना रानावनात मात्र उन्हाळी रानफुलांचा बहर आला आहे. चैत्र महिना सुरू झाल्यानंतर रानावनात झाडांना पालवी फुटली असून या पालवीतच बहावा, निवडुंग, गुलमोहर आदी वृक्षांना मोठ्या प्रमाणात फुलांचा बहर आला आहे. रानावनात झाडांना पालवी बरोबरच आलेला हा बहर निसर्गप्रेमी, पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय होत असून निसर्गातील उन्हाळ्याच्या काहिलीत बहरणारी रानफुले निसर्गाची शोभा वाढवित आहेत.
उन्हाळा हा काहीसा उदासवाना ऋतू असतो. झाडांची पानगळ, उन्हाची वाढणारी काहीली व भकास वाटणारे रान असे काहीसे चित्र सर्वत्र दिसते. मात्र याच ऋतूत रानातील अनेक फळ झाडे, फुल झाडे फुलून येतात यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात रानाची शोभा वाढत असून रानावनात झाडांना उन्हाळी रान फुलांचा, फळांचा बहर आलेला दिसत आहे. कोकणातील सह्याद्री पर्वताची कडे कपारीत, रस्त्यांच्या दुतर्फा, शेत शिवारात असंख्य प्रकारच्या फळ, फुल झाडांना पालवी बरोबरच फुलांचे गुच्छ आले आहेत. एरवी उन्हाळा रुक्ष, उदास वाटतो मात्र रानावनात फुलणाऱ्या उन्हाळी रान फुलांनी उन्हाळ्यात ही निसर्ग आपली शोभा कायम ठेऊन सुंदरता कायम राखत आहे. चैत्र महिन्यातील हे निसर्ग सौंदर्य पाहून निसर्गप्रेमी ,पर्यटक समाधान व्यक्त करीत आहेत.
विलास देगावकर
उन्हाळा वाढत असताना रानावनात असंख्य प्रकारच्या झाडा, वेलीना फुलांचा बहर आला आहे. हा बहर रानावणाची शोभा वाढत आहे. रानात बहरलेली ही फुले पाहणे अतिशय आनंदाचे आहे. ही फुले ऐन उन्हाळ्यात फुलतात. या नंतर काही दिवसांनी पावसाळा सुरू होईल.पावसाळा जवळ आल्याचे उन्हाळी रान फुले संकेत देतात.
फुल निरीक्षक, माणगाव
