आ.जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून वरसोली किनारी मार्गदर्शक स्तंभाचे काम मार्गी

कामासाठी एक कोटीचा निधी मंजूर

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

तालुक्यातील वरसोली खाडी मुखाजवळ मार्गदर्शक स्तंभाच्या रिंग बोयाची उभारणीचे काम आ. जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून मार्गी लागले आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कार्यारंभ आदेश देखील देण्यात आले आहेत. त्यामुळे आता हे काम लवकर मार्गी लागून खाडीत प्रवेश करताना मच्छिमार नौकांचा धोका कमी होणार आहे. आ. जयंत पाटील यांच्या प्रयत्नांमुळेच हा प्रश्‍न मार्गी लागल्याने वरसोलीमधील मच्छिमार सोसायटी, नाखवा संघ, गाव पाटील आणि मच्छिमार समाजाने समाधान व्यक्त करीत जयंत पाटील आणि शेकापला धन्यवाद दिले आहेत. या कामासाठी एक कोटी सहा लाख ८२ हजार ९८७ रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे.

समुद्रात मासेमारीसाठी जाताना तसेच परतत असताना वरसोली येथील खाडीतून प्रवेश करणे धोकादायक बनले आहे. मोठया प्रमाणावर मोठमोठया दगडांचा सामना करावा लागत असल्याने मच्छिमार नौकांसाठी हा मार्ग त्रासदायक झाला आहे. कोणताही दिशादर्शक मार्गदर्शक स्तंभ येथे नसल्याने धोका लक्षात येत नाही. त्यामुळे आतापर्यंत दोन नौकांना येथे जलसमाधी मिळाली आहे. त्यामुळे वरसोली खाडी मुखाजवळ मार्गदर्शक स्तंभाच्या रिंग बोयाची उभारणी करण्यात यावी अशी मागणी कोळी समाजाने वारंवार करुन देखील शासन त्याकडे डोळेझाक करीत होते. शेवटी वरसोली कोळीवाडा येथे कोळी समाजाचे पाटील, पंच तसेच नाखवा संघाचे चेअरमन विविध सोसायटीचे चेअरमन, खंडोबा देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष, मार्तंड देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष अशा सर्वांनी एकत्र होत वरसोली ग्रामपंचायत सदस्य सुरेश घरत यांच्या सहकार्याने शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांना साकडे घालीत अन्याय निवारण्याची मागणी केली होती. त्यावेळी आ. जयंत पाटील यांनी बंधार्‍याच्या झालेल्या नुकसानीची पहाणी करुन त्वरित संदर्भित अधिकारी वर्गासोबत प्रत्यक्ष बोलणी करून पंचनामा करून घेण्याचे निर्देश देत सर्व कोळीबांधवांना सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार आ. जयंत पाटील यांनी बंदरे विभागाला या संदर्भात पत्र देत तातडीने सदर बंधार्‍याची दुरुस्ती आणि वरसोली खाडी मुखाजवळ मार्गदर्शक स्तंभाची उभारणी करण्याची मागणी केली.

धुप प्रतिबंधक बंधार्‍यापासून 200 मीटर अंतरावर चाळमळा येथे खाडीमुखाजवळ मार्गदर्शक स्तंभाची उभारणी करण्याचे काम सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये राज्य शासनाच्या लेखाशिर्ष क्र. 30511835 (तरंगती जेट्टी व तत्सम प्रवाशी सुविधा उभारणे) या योजनेअंतर्गत प्रस्तावित करण्यात आले होते. सदर कामाचे 1.50 कोटी इतक्या किंमतीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. त्यासाठी लागणारी प्रशासकीय मान्यता मिळवून निविदा प्रक्रीय देखील पूर्ण झाली आहे. नुकतेच या कामाचे कार्यारंभ आदेश महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडून बजावण्यात आले आहेत. १२ महिन्यात हे काम पूर्ण करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.

त्यामुळे प्रत्यक्षात या रिंग बोयाच्या उभारणीला सुरुवात होणार असल्याने वरसोली येथील कोळी समाजाने समाधान व्यक्त करीत आ. जयंत पाटील यांना धन्यवाद दिले आहेत. यावेळी मार्तंड विकास सहकारी संस्था, वरसोलीचे चेअरमन धर्मा घारबट, व्हाईस चेअरमन प्रभाकर पाटील, मार्तंड मच्छिमार नाखवा संघाचे चेअरमन दत्ताराम घारबट, व्हाईच चेअरमन शेखर बना, जय मल्हार मच्छिमार नाखवा संघाचे चेअरमन परशुराम दांडेकर, व्हाईस चेअरमन महेश कोळी यांच्यासह गावकीचे पाटील, पंच आणि ग्रामस्थांनी धन्यवाद देत समाधान व्यक्त केले आहे.

Exit mobile version