बचत गटातील महिलांच्या प्रतिसादाने

सावित्रीबाई फुले जयंती साजरी
| पेण | प्रतिनिधी |
आपल्या देशात महिलांना शिक्षणासाठी शाळा नव्हत्या समाजात बाहेर पडायची हिंमत नव्हती अशा काळात समाजाचा विरोध पत्करून सावित्रीबाई फुले यांनी यांनी 175 वर्षापूर्वी मुलींची पहिली शाळा काढली. ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला याचेच प्रतीक म्हणून समाजकारण, राजकारण, वैद्यकीय, शैक्षणिक व संरक्षण या सर्व क्षेत्रात महिला पुढे येत आहेत. एक प्रकारे सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी उभारलेली क्रांतीज्योत आहे असे प्रतिपादन सिडको एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र हिरे यांनी आमटेम येथे झालेल्या महिला मेळाव्यात काढले.

साकव संस्था व अनामिका महिला महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने व परिसर महिला संघाच्या सहकार्याने पेण तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद सेंट्रल स्कूल आमटेम येथील भव्य सभागृहात साकव संस्थेचे सचिव अरुण शिवकर यांच्या अध्यक्षतेखाली 126 बचत गटातील महिलांचा वार्षिक मेळावा घेण्यात आला या मेळाव्याला 126 बचत गटातील हजारोच्या आसपास महिला प्रतिनिधी हजर होत्या यावेळी अनामिका महिला महासंघातील संचालक मंडळातील 21 प्रतिनिधींना उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देउन सन्मानित करण्यात आले यावेळी सर्व बचत गटाच्या वतीने मंजुळा पाटील यांनी सर्व महिलांना संघटित करून स्वावलंबी केल्याबद्दल त्यांना साकव तर्फे विशेष गौरव पुरस्कार देण्यात आला.

यावेळी नयना कदम यांनी कोंडवी गावच्या 22 बचत गटांचा व मंजुळा पाटील यांनी 126 बचत गट, सात महिला संघ व एक महिला महासंघ यांच्या वार्षिक उलाढालीचे जाहीर वाचन केले. यावेळी 72 लाख दहा हजार रुपयाचे महिलांच्या गरजा लक्षात घेउन त्यांना धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी गडब प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर गांगुरडे व त्यांच्या कर्मचारी यांनी महिलांचे आरोग्य, माता बाल संगोपन, कमी वयातील लग्न व सध्या नव्याने येउ पाहत असणार्‍या कोरोना काळात काय काळजी घ्यावी याची माहिती दिली. तर अप्लाईड एनवोर्मेन्ट रिसर्च फाउंडेशन प्रतिनिधी सचिन पाटील, कैलास गावंड यांनी निरधूर चुलीचे प्रात्यक्षित दाखवले. हे प्रात्यक्षिक महिलांना फारच आवडले असून त्यांनी 500 निर्धूर चूल घेण्याचा निर्धार केला आहे.

यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे प्राचार्य जगदीश भगत यांनी त्यांच्या संस्थेत सुरू असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. साकव संस्थेमार्फत 21 मुलांनी इलेक्ट्रिशन, प्लंबर, नर्सिंग हे ट्रेड पूर्ण केले आहेत व सध्या ते ठीक ठिकाणी चांगल्या पगारावर काम करीत असल्याचे सांगितले. सध्या या संस्थेत ब्युटी पार्लर, हॉटेल मॅनेजमेंट यासारखे ट्रेड सुरू असून साकव संस्थेच्या वतीने आलेल्या विद्यार्थ्याना प्रथम प्रवेश दिला जाणार आहे. असे त्यांनी सांगितले.

Exit mobile version