सायबर चोरांकडून महिलेची सहा लाखांची फसवणूक

| पनवेल | वार्ताहर |

अधिकारी असल्याचे सांगून दोघा सायबर चोरांनी तळोजा येथे राहणाऱ्या एका महिलेचा फ्लॅट भाड्याने घेण्याच्या बहाणा करून तिच्या खात्यातून तब्बल सहा लाख रुपये काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तळोजा पोलिसांनी दोघा सायबरचोरांवर फसवणुकीसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

तळोजा येथे राहणाऱ्या या महिलेच्या पतीचा कळंबोलीमध्ये फ्लॅट आहे. हा फ्लॅट भाड्याने देण्यासाठी त्यांनी एका वेबसाइटवर जाहिरात दिली होती. ऑगस्ट महिन्यामध्ये एका सायबरचोराने दीपक बजरंग पवार नावाने या महिलेशी संपर्क साधला होता. त्यावेळी त्याने लष्करामध्ये अधिकारी असल्याचे तसेच त्याची कुलाबा येथे बदली झाल्याचे सांगितले. तसेच, त्यांचा कळंबोलीतील फ्लॅट भाड्याने घेण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले. या महिलेचा त्याच्यावर विश्वास बसावा, यासाठी त्याने स्वतःचे गणवेशामधील छायाचित्र, ओळखपत्र, कॅन्टीन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, तसेच फॅमिली फोटो या महिलेच्या व्हॉट्सॲपवर पाठवून दिले. काही दिवसांनंतर या सायबरचोराने डिपॉझिटची रक्कम देण्याच्या बहाण्याने या महिलेशी संपर्क साधला. त्यानंतर त्याने साथीदार अनिकेत विजय हा त्यांच्या ऑफिसमधील अकाऊंटंट असल्याचे सांगून त्याला कॉन्फरन्स कॉलवर घेतले. त्यानंतर त्या दोघांनी या महिलेला बोलण्यात गुंतवून तिच्याकडून बँकखात्याची माहिती जाणून घेतली. तसेच, ते लष्करामध्ये असल्याने त्यांना ‌‘रिव्हर्स ट्रान्झॅक्शन’ करावे लागेल, असा बहाणा करून महिलेला ‌‘गुगल पे’द्वारे पैसे पाठविण्यास भाग पाडले. त्यानुसार, या महिलेने त्याला प्रथम 50 हजार रुपये पाठवले, मात्र हे पैसे मिळाले नसल्याचा बहाणा करून त्याने 45 हजार रुपये पाठवण्यास सांगितले. ती रक्कमही त्याला मिळाली नसल्याचा बहाणा करून त्याने 49,995 ही रक्कम चारवेळा पाठविण्यास भाग पाडले. या महिलेने एकूण सहा लाखांची रक्कम भामट्याला पाठविल्यानंतर फसवणूक होत असल्याचे या महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर या महिलेने ऑनलाइन सायबर पोर्टलवर तक्रार केली.

Exit mobile version