लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये महिलेची लाखोंची फसवणूक

अल्पवयीन मुलीचेही लैंगिक शोषण केल्याचा आरोप

। पनवेल । प्रतिनिधी ।

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या 43 वर्षीय महिलेची 54 लाख 73 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्यासह तिच्या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप कळंबोलीतील एका व्यक्तीवर करण्यात आला आहे. अजित नारप्पेरेडी असे फसवणूक केलेल्या व्यक्तीचे नाव असून, कळंबोली पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध सुरू आहे.

या प्रकरणातील तक्रारदार महिला आपल्या अल्पवयीन मुलीसह कळंबोली परिसरात राहते. मार्च 2023 पासून आरोपी अजित नारप्पेरेडी हा तिच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. या काळात आरोपीने महिलेच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा तसेच तिच्याकडून 54 लाख 73 हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे. महिला घरी नसताना आरोपीने तिच्या अल्पवयीन मुलीला मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यासोबत लैंगिक स्वरूपाचे गैरवर्तन केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच मुलीला तिच्या आईच्या संमतीशिवाय एका दिवसासाठी बाहेर नेल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या प्रकाराबाबत महिलेने आरोपीला जाब विचारला असता, त्याने महिला आणि तिच्या मुलीला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच दोघींना जीवे मारण्याची धमकी देऊन तो तेथून निघून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी सुरुवातीला गुन्हा दाखल न झाल्याने पीडित महिलेने न्यायालयात क्रिमिनल ॲप्लिकेशन दाखल केले होते. त्यानंतर न्यायालयाच्या तोंडी आदेशानंतर कळंबोली पोलिसांनी आरोपी अजित नारप्पेरेडी याच्याविरोधात गुन्हा नोंदवला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

Exit mobile version