। रसायनी । प्रतिनिधी ।
खालापूर तालुक्यातील जांभिवली गावात चालू विद्युत तार अंगावर पडून एका वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला. जुनाट जीर्ण झालेल्या विद्युत तारा जोरदार वारा आणि पाऊसामुळे तुटतात, याची वारंवार तक्रार या परिसरातील जागरूक नागरिक यांनी करून देखील वीज वितरण कंपनीने दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सुरेश गावडे यांनी सांगितले.
जांभिवली गावातील वृद्ध महिला सुलोचना दत्तात्रेय गावडे (63) या पहाटे घराच्या मागील बाजूस असलेल्या प्रसाधनगृहाकडे जात होत्या. यावेळी अचानक त्यांच्या अंगावर विद्युत प्रवाह सुरू असलेली तार तुटून पडली. त्यामुळे विजेच्या धक्क्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत घरातील त्यांचा नातू व शेजारील लोकांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने वीज वितरण कंपनीच्या लोकांना पाचारण करून वीज प्रवाह बंद केला.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार, चौक प्रभारी विशाल पवार, पोलीस उप निरीक्षक शिवाजी जुंदरे, उप कार्यकारी अभियंता महादेव मुंडे, सहाय्यक वीज अभियंता योगेश देसाई यांना कळविल्यावर सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय चौक येथे पाठविण्यात आला. महिलेचा मृत्यू वीज वितरणच्या हलगर्जीपणामुळे व वेळीच तारांची दुरुस्ती न केल्यामुळे झाला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे दोन खांबांमधील विद्युत वाहिन्यांना आठ आठ जोड दिले आहेत, त्यामुळे या वाहिन्या आणखी कमजोर होऊ न गेल्या आहेत. या परिसरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठाबाबत अनेक पक्षांनी मोर्चे काढले, तीव्र निषेध व्यक्त केला. पाचच दिवसांपूर्वी आमदार महेश बालदी यांनी अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांची संयुक्त बैठक चौक येथे घेतली होती, तरीही यात सुधारणा न झाल्याने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. येणाऱ्या गणेशोत्सव काळात अशी घटना घडू नये तसेच योग्य ती दुरुस्ती करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.
विद्युत तार अंगावर पडून महिलेचा मृत्यू
