तळोजा येथून दोन मुलींसह महिला बेपत्ता

| पनवेल | प्रतिनिधी |

तळोजा फेज-2 येथील केदार सोसायटी परिसरातून 28 वर्षीय महिला आपल्या दोन अल्पवयीन मुलींसह बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली असून, पोलीस तिघींचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजाता चंद्रकांत जाधव (28) या आपल्या राहत्या घरातून बाहेर पडल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या दोन मुली स्वरा जाधव (7) आणि श्रृती जाधव (5) होत्या. घरातून बाहेर पडल्यानंतर तिघीही परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. नातेवाईक व परिचितांकडे चौकशी करूनही त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तळोजा पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. सुजाता जाधव यांचा रंग गोरा, उंची सुमारे 5 फूट 3 इंच, चेहरा गोल, नाक सरळ, डोळे व केस काळे असून शरीरयष्टी मध्यम आहे. त्यांनी लाल रंगाचा पंजाबी ड्रेस व पायात चप्पल घातली असून, गळ्यात काळ्या मण्यांचे मंगळसूत्र आहे. त्या मराठी व हिंदी भाषा बोलतात.

त्यांच्यासोबत असलेली मोठी मुलगी स्वरा हिची उंची सुमारे साडेतीन फूट असून, तिने मरून रंगाचा टी-शर्ट व काळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे. तर लहान मुलगी श्रृती हिची उंची सुमारे तीन फूट असून तिनेही मरून रंगाचा टी-शर्ट व काळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अजयकुमार मोहिते हे प्राथमिक तपास अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. महिला व तिच्या दोन्ही मुलींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक तपास सुरू आहे. तिघींबाबत कोणास काही माहिती मिळाल्यास तळोजा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version