| मुंबई | प्रतिनिधी |
दादर रेल्वे स्थानकात मद्यधुंद व्यक्तीने एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. मात्र, या घटनेनंतर प्रवाशांनी महिलेचा विनयभंग करणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीला पकडून चांगलाच चोप दिला. दादर रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला गृहिणी असून, ती रेल्वे पकडण्यासाठी बुधवारी (दि.12) सायंकाळी 6 – 7 च्या सुमारास दादर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 8 वर थांबली होती. त्यावेळी फलाटावर प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. प्रवासी लोकलची वाट पाहत होते. त्यावेळी हा प्रकार घडला. फलाट क्रमांक 8 वर असलेल्या गर्दीचा आरोपीने गैरफायदा घेतला. तो महिलेच्या अगदी जवळून गेला आणि त्याने तिचा विनयभंग केला. पीडित महिलेने तत्काळ आरडाओरड केली. त्यामुळे आजूबाजूच्या प्रवाशांनी आरोपीला पकडले. संतप्त प्रवाशांनी त्याला चांगलाच चोप दिला आणि नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी आरोपीला दादर रेल्वे चौकीत नेले आणि त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हमिदुल्ला मुख्तार शेख (29) असे अटक आरोपीचे नाव असून, तो कुर्ल्यातील इंदिरा नगर परिसरात वास्तव्याला आहे. आरोपी लहान-मोठे कामे करून स्वत:चा उदरनिर्वाह करतो. तो मूळचा झारखंडमधील रहिवासी आहे. याप्रकरणी दादर रेल्वे पोलीस अधिक तपास करीत आहेत.