। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
रत्नागिरी तालुक्यातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कुवारबाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरूवारी (दि.13) संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस असून अमित गणेश चव्हाण (22) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमित चव्हाण हा शहरातील एका नामांकित महाविद्यालयात S.Y BA चे शिक्षण घेत होता. विद्यार्थ्यांना होळी सणाची सुट्टी असल्याने अमित बुधवारी रजा अर्ज देऊन वसतिगृहातून बाहेर पडला. घरी गेलेला अमित दुसऱ्या दिवशी गुरुवारी दुपारच्या सुमारास पुन्हा वसतिगृहामध्ये आला. रूममध्ये आल्यावर त्याने रुमचा दरवाजा लावून घेत त्याने स्वतःला बंद करून घेतले होते. रूम बंद असल्याने इतर विद्यार्थ्यांनी दरवाजा ठोठावत त्याला आवाज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, अमितने कोणताही प्रतिसाद दिला नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी याबाबत येथील कर्मचाऱ्यांना कल्पना दिली. त्यानंतर वसतिगृहाचे अधिकारी, कर्मचारी दाखल झाले. त्यांनी दरवाजा उघडताच अमित गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला.
अमितच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास चालू केला आहे.