संकल्प संस्था व देवदूत ग्रुप कुंडे वहाळ यांचा उपक्रम
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
‘होळी रे होळी पुरणाची पोळी’ अशाप्रकारे संदेश देत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. ती पुरणपोळी नंतर न भिजवता तसेच होळीत न टाकता ती जमा करा अशा प्रकारचा संदेश आणि आवाहन संकल्प शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्यावतीने करण्यात आले होते. त्याला कुंडेवहाळ, करंजाडे परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एक-दोन नव्हे तर, सुमारे सहाशेहून अधिक पोळ्या एकत्रित जमा होऊन गोरगरिबांना वाटण्यात आल्या. संकल्प संस्था व देवदूत ग्रुपच्या या सामाजिक होळीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
होळी हा सण आजही पनवेल परिसरामध्ये पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. . परिसरामध्ये अनेक ठिकाणी होळी पेटविण्यात आली. वाईट विचारांचे दहन करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे प्रतीक असणार्या या सणाला आनंदाचे उधान प्राप्त झाले. दरवर्षाप्रमाणे यावेळीसुद्धा पारंपरिक पद्धतीने पुरणपोळ्या करून होळीला नैवेद्य दाखविण्यात आला. नैवद्य ओला करून तो होळीमध्ये टाकण्याची प्रथा आहे. मात्र, अन्न हे परब्रह्म असल्याने ती पुरणपोळी कोणाच्यातरी मुखात जावी, त्याचा गोडवा गोरगरिबांना चाखता यावा या उद्देशाने संकल्प शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या संस्थापिका वैशाली जगदाळे यांनी होळी दान अभियान दरवर्षीप्रमाणे यंदाही हाती घेतले होते.
या उपक्रमाला कुंडेवहाळ येथील ग्रामस्थांनी यंदाही उस्फूर्त प्रतिसाद दिला. येथील देवदूत ग्रुप, सरपंच, उपसरपंच तसेच पदाधिकार्यांनी ग्रामस्थांनी विशेष करून महिलांनी पुरणपोळ्या, कुरडई, करंज्या संकल्प शैक्षणिक व सामाजिक संस्थेकडे कडे सुपूर्द केल्या. होळीला नैवेद्य दाखवून त्या पुरणपोळ्या गरिबांना वाटप करण्यासाठी देण्यात आल्या. करंजाडे, कामोठे, चिंचपाडा परिसरातूनही पोळी दान अभियानाला उस्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. 600 हून अधिक पुरणपोळ्या एकत्रित जमा झाल्या. या पोळ्या कळंबोली उड्डाणपुलाखालील ओपन स्कूलच्या मुलांना तसेच त्यांच्या पालकांना देण्यात आल्या. त्याचबरोबर येथे राहणार्या बेघर कुटुंबांनीसुद्धा पुरणपोळ्यांचा आस्वाद घेतला. या व्यतिरिक्त कळंबोली येथील झुडियोसमोरील झोपडपट्टीमध्ये राहणार्या कुटुंबांचीसुद्धा पुरणपोळी आणि इतर पदार्थांनी होळी गोड झाली. यावेळी ज्ञानेश्वर भोईर, नागेश कडू, संदीप भोईर, सरपंच सदाशिव वास्कर, नरेश गांगरे, राजेश वास्कर, जीवन गांगरे, स्वेद कडू, सुप्रीत भोईर, भानुदास वास्कर, संकल्पच्या संस्थापिका वैशाली जगदाळे, पल्लवी एरंडे उपस्थित होत्या.
होळी निमित्ताने पुरण पोळी दानाकरिता संकल्प शैक्षणिक व सामाजिक संस्थेने यंदाही आवाहन केले होते. त्यानुसार कुंडेवहाळ येथील देवदूत ग्रुपने विशेष पुढाकार घेतला. त्याचबरोबर करंजाडे, परिसरातूनही पुरणपोळी, कुरडई, अनारसे त्याचबरोबर इतर पदार्थ अत्यंत स्वयंस्फूर्तीने संकलित करण्यात आले. गोरगरीब गरजू, बेघर आणि कळंबोली उड्डाणपुलाखाली बिन भिंतीच्या शाळेतील मुलं, त्यांच्या आई-वडिलांची होळी गोड करण्याचे सत्कार्य करता आले.
वैशाली जगदाळे, संस्थापिका,
संकल्प शैक्षणिक व सामाजिक संस्था, करंजाडे