| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
तब्बल दोन महिन्यांपूर्वी सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवून आरोपीला अटक करण्यात पनवेल तालुका पोलिसांना यश आले आहे. करण नामदेव पाटील (राहणार फडके पाडा, शिळफाटा ठाणे) असे आरोपीचे नाव आहे.
पनवेल तालुका पोलिसांना 11 एप्रिल रोजी चिंचवली जवळील पनवेल दुन्द्रे रस्त्याच्या वनविभागाच्या जागेत झुडपामध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू केले. या महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. आजूबाजूच्या गावांमध्ये जाऊन शोध घेतला. मात्र तिची ओळख पटली नाही. पोलिसांनी तब्बल 200 पेक्षा अधिक मिसिंग महिलांची पडताळणी केली. त्यासोबत पोलिसांचा तांत्रिक तपास सुरू केला. यावेळी हत्या झालेल्या महिलेच्या वर्णनासोबत एका महिलेची माहिती प्राप्त झाली आणि पोलिसांनी त्यानुसार आपला तपास सुरू केला. यावेळी शीळ डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनिता देवी भगवान राजभर (30) या महिलेची ओळख पटली. तालुका पोलिसांनी या महिलेच्या संपर्कात असलेल्या इसमाला ताब्यात घेतले. त्याचा मोबाईल फोन बाबत तपास केला असता तो मयत महिलेचे संपर्कात असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याच्याकडे तपास केला असता या अनिता देवी राजभर या महिलेने त्याच्यासोबत लग्नाचा तगादा लावला होता आणि त्याला तिच्यासोबत लग्न करायचे नसल्याने करण पाटील याने 6 एप्रिल रोजी तिच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह कारमधून चिंचवली गावचे हद्दीत आणून कारमधील पेट्रोल काढले आणि ते तिच्या प्रेतावर टाकून तिला जाळून टाकले.






