| पनवेल | प्रतिनिधी |
लग्नाचे आमिष दाखवून महिलांचा विश्वास संपादन करत त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा नवी मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मॅट्रिमोनियल संकेतस्थळाच्या माध्यमातून एका महिलेशी ओळख वाढवून तिची तब्बल 6 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नागेश अर्जुन पवार आणि त्याचा साथीदार आकाश मोहनलाल वर्मा यांना वाशी पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. तांत्रिक तपास आणि पोलिसांच्या विशेष सापळ्यामुळे या प्रकरणाचा उलगडा झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने ‘जीवनसाथी डॉट कॉम’ या विवाहविषयक संकेतस्थळावर लग्नासाठी आपले प्रोफाइल तयार केले होते. याच माध्यमातून मुख्य आरोपी नागेश पवार याने तिच्याशी संपर्क साधला. ओळख वाढवत आणि विश्वास संपादन करत त्याने महिलेला आर्थिक व्यवहारांच्या जाळ्यात ओढले. आरोपीने गाडी खराब झाल्याचे कारण पुढे करून सुरुवातीला महिलेकडून 66 हजार रुपये घेतले. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून आणखी पैसे उकळल्याचा आरोप आहे. अशा प्रकारे एकूण 6 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे तपासात समोर आले. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदणे आणि पोलीस निरीक्षक लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणासह कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तपासून आरोपींचा माग काढला. पोलिसांनी मुख्य आरोपी नागेश पवार याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्या साथीदारालाही अटक करण्यात आली.
लग्नाचे आमिष दाखवून महिलेला लाखांचा गंडा
