महिलेचे केस कापून विनयभंग

रसायनीत तरुणाविरोधात गुन्हा

| खोपोली | प्रतिनिधी |

मोबाईल तपासल्याबद्दल जाब विचारल्याचा राग मनात धरून परिचित महिलेवर हाताबुक्क्यांनी मारहाण, शिवीगाळ व दमदाटी करून तिच्या डोक्यावरील समोरील केस ट्रिमरने कापल्याची धक्कादायक घटना रसायनी पोलीस ठाणे हद्दीत घडली. या प्रकारामुळे महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

रसायनी पोलीस ठाणे हद्दीतील सेबीरोड, रविराज गार्डन, खोली क्रमांक 302, मोहोपाडा येथे दि. 29 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दि. 30 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. तक्रारदार महिला आणि आरोपी एकमेकांच्या परिचयाचे आहेत. आरोपी हा महिलेचा मोबाईल तपासत असल्याने महिलेने ‌‘दुसऱ्याचा मोबाईल असा तपासायचा नसतो‌’, असे सांगितले. याचा राग मनात धरून आरोपीने महिलेला हाताबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ व दमदाटी करून ट्रिमरच्या सहाय्याने तिच्या डोक्यावरील समोरील केस कापले. या प्रकारामुळे तक्रारदार महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न झाली. याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक पोलीस हवालदार पवार तपास करीत आहेत.

Exit mobile version