पोषण आहार निकृष्ट आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई
| रायगड | प्रतिनिधी |
अंगणवाडीतील बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या निकृष्ट दर्जावरून महायुती सरकारवर चौफेर टीका होत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व अंगणवाड्यांची 48 तासांत प्रत्यक्ष तपासणी करून अहवाल सादर करा, असे निर्देश सरकारने दिले आहेत. तसेच पोषण आहार निकृष्ट आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा ही इशारा देण्यात आला आहे.
महिला व बालविकास विभागाने अंगणवाड्यांमधील पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत कठोर भूमिका घेतली आहे. बालकांच्या पोषणाच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे स्पष्ट करत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी राज्यातील अंगणवाड्यांमध्ये मिळणाऱ्या पोषण आहाराची तातडीने तपासणी करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
सर्व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या अखत्यारीतील मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व अंगणवाड्यांना प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. अंगणवाडीत पोहोचलेला पोषण आहार योग्य दर्जाचा आहे की नाही, तो सुरक्षित आहे की नाही आणि तो बालकांना देण्यायोग्य स्थितीत आहे की नाही, याची बारकाईने पडताळणी केली जाणार आहे. विभागीय आयुक्त, जिल्हा कार्यक्रम अधिकारी तसेच जिल्हा परिषद प्रशासनानेही आपल्या कार्यक्षेत्रातील अंगणवाड्यांना प्रत्यक्ष भेट देऊन आहाराच्या गुणवत्तेची खातरजमा करावी, असेही सांगण्यात आले आहे. तपासणी झाल्यानंतरही पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत तक्रार आल्यास संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला जबाबदार धरले जाईल. निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
