। मुंबई । प्रतिनिधी ।
पेण तालुक्यातील वडखळ ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या अंगणवाडी क्रमांक-3 मध्ये बालकांसाठी घरपोच वाटप करण्यात येणार्या मल्टीमिक्स सीरियल्स एंड प्रोटीन या पोषण आहाराच्या पाकिटामध्ये मृत उंदीर आढळून आल्याच्या घटनेवरून बुधवारी (दि.12) विधानसभेत महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांना आमदारांसह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी धारेवर धरले. आमदार विजय वडेट्टीवार, आमदार विश्वजीत कदम, सरोज अहिरे आदी आमदारांनी या गंभीर प्रश्नावर प्रश्नांची सरबत्ती केली.
विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर म्हणाले की, लहान मुलांच्या आरोग्याचा गंभीर विषय आहे. राज्यात अशा तक्रारी कुठे ना कुठे होत असतात. तुमचा विभाग साधारण ठेकेदाराना पोषण आहार वाटपाचे काम देतात. त्यामुळे अशा तक्रारी येतात. त्यांना त्यांची नावे ब्लॅकलिस्ट झाली तरी फरक पडत नाही. त्या ऐवजी मोठ्या नावाजलेल्या कंपन्यांना पोषण आहार वाटपाचा ठेका दिल्यास ते काळजीपूर्वक वाटपाचे काम करतील. शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी असे निर्देश विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी दिले.
पोषण आहाराच्या पाकिटामध्ये मृत उंदीर सापडल्याचा व्हीडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. तरी ही सरकारी प्रयोगशाळा नमुने तपासण्यास नकार देतात. आपण या प्रकरणी कोणाला दोषी धरणार? असा सवाल आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला. बाल हक्क समितीची अध्यक्ष असताना महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यात केलेल्या दौर्यात शालेय पोषण आहाराच्या संबंधी हजारो तक्रारी प्राप्त झाल्या. यामध्ये महाराष्ट्र स्टेट कन्ज्युमर फेडरेशन हि संस्था दोषी आहे. हे निष्पन्न झाले. याबात शासनाला आम्ही शिफारस करून सुद्धा अद्याप कारवाई झाली नाही, असे आमदार सरोज अहिरे म्हणाल्या. मंत्री अदिती तटकरे विभागाची बाजु सावरत म्हणाल्या की, 28 जानेवारीला वडखळ येथील अंगणवाडी येथे मृत उंदराचे अवशेष असलेले एक पॉकिट सापडले. त्याचा सरपंचांसमोर पंचनामा करून ते पाकीट तपासणीसाठी मुंबई-पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवले होते. त्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. याबाबत स्वतंत्र समिती नेमुन चौकशी केली जाईल. यात जे कोणी दोषी असतील. त्यांच्यावर कारवाई केली जाईल.