। अलिबाग । प्रमोद जाधव |
जिल्ह्यामध्ये होळीचा उत्सव गुरुवारी (दि.13) जिल्ह्यात ठिकठिकाणी साजरा केला जाणार आहे. त्याची तयारी ग्रामीण व शहरी भागात अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यामध्ये होळीनिमित्त चार हजार 4012 ठिकाणी होळ्या उभारल्या जाणार आहेत. विधीवत पुजन करून रात्री होळीचे दहन केले जाणार आहे.
होलीकोत्सवानिमित्त जिल्ह्यामध्ये दोन दिवस 112 ठिकाणी मिरवणुका काढल्या जाणार आहेत. त्याअनुषंगाने रायगड पोलिस दलामार्फत पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.रायगड जिल्ह्यामध्ये होलीकोत्सव जल्लोषात साजरा केला जातो. पारंपरिक पेहराव करून होळीला पुरणाची पोळी नैवेद दाखवून पूजा केली जाते. त्यानंतर रात्री होळीचे दहन केले जाते. गेल्या अनेक वर्षापासूनची ही परंपरा आजही जपली जाते. मुंबई, ठाणे येथे नोकरी निमित्त असलेले चाकरमानीदेखील या उत्सवात सहभागी होऊन हा उत्सव जल्लोषात साजरा करतात.
ग्रामीण भागासह शहरी भागात ठिकठिकाणी होळी उभारल्या जातात. वेगवेगळे सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम घेऊन हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होलीकोत्सवाची तयारी गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. यंदा होळी बुधवारी (दि.13) आहे. जिल्ह्यात चार हजार 12 ठिकाणी होळ्या उभारल्या जाणार आहेत. त्यात दोन हजार 898 सार्वजनिक व एक हजार 114 खासगी होळ्यांचा समावेश आहे. काही ठिकाणी केळीचे झाड तर काही ठिकाणी परंपरेनुसार सावरीचे झाड उभे केले जाणार आहे. विधीवत पूजा करून हा सण साजरा केलाजाणार आहे. होळीनिमित्त 29 ठिकाणी मिरवणुका काढल्या जाणार आहेत. तर दुसर्या दिवशी धुलीवंदन साजरा केला जाणार आहे. या दिवशी प्रत्येकाच्या अंगावर रंगाची उधळण केली जाणार आहे. या निमित्ताने जिल्ह्यातील 98 ठिकाणी मिरवणुका काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे. पोलीस ठाणे स्तरावर होलीकोत्सावाबरोबरच धुळीवंदनाच्या दिवशी ठिकठिकाणी पोलीस तैनात असणार आहे.
पर्यावरणपुरक होळी साजरी करा
अवैध वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळून अनेक प्रकारे नैसर्गिक आपत्ती निर्माण होण्याची शक्यता आहेे. होळीत अनेक ठिकाणी गोवर्या, लाकडे जाळली जातात. या प्रकारामुळे प्रदूषणातही भर पडते. परिणामी, पर्यावरणालाही धोका पोहोचतो. धार्मिक महत्व असल्याने याबाबतही नागरिकांमध्ये प्रबोधन होण्याची गरज निर्माण झाली आहे. विविध मंडळांनी एकत्र येऊन सार्वजनिकरित्या एकाच ठिकाणी होळी करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. या सणामध्ये कोणतीही वृक्षतोड करु नये तसेच कोणत्याही प्रकारे वन्यप्राण्याची शिकार करु नये. पर्यावरणपूरक होळी साजरी करावी, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.