एसटीविना प्रवाशांची पायपीट

महिलांसह विद्यार्थ्यांना करावा लागतोय पायी प्रवास

| दिघी | वार्ताहर |

‘गाव तेथे एसटी’ हे ब्रीद वाक्य मिरवणार्‍या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसची अद्याप रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील वांजळे गावाला प्रतीक्षाच करावी लागत आहे. एसटीचा प्रवास सुरक्षित मानला जातो, त्यामुळे ग्रामीण भागातील लोक आजही मोठ्या आशेने गावाच्या फाट्यावर एसटीची वाट पाहात असतात. परंतु, थेट गावात एसटी पोहोचत नसल्याने वांजळे येथील आबालवृद्धांना धूळ मातीतून दहा किमी ची पायपीट करुन फाटा गाठावा लागतो.

बोर्लीपंचतन शहराशेजारी उंच डोंगर माथ्यावर जवळपास पाच किलोमीटर अंतरात वांजळे गाव आहे. येथील तीन वाड्या मिळून अंदाजे दोनशेहून अधिक घरे आहेत. हा संपूर्ण भाग दुर्गम म्हणून ओळखला जातो. सध्या येथील गावकर्‍यांना महामंडळाकडून मिळणारा एसटी प्रवास बंद आहे. त्यामुळे येथील आबालवृद्धांसह शालेय विद्यार्थ्यांना घनदाट जंगलातून भीतीदायक प्रवास मोठा जिकिरीचा करावा लागत आहे.

वांजळे गाव परिसरात मागील चार दिवसांपूर्वी झालेल्या घटनेमध्ये एका वृद्धांस वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मोठ्या दुखापतीला सामोरे जावे लागले. कारण, हा दुर्गम भाग असल्याने येथील घनदाट जंगलातून पायी प्रवास शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक बनला आहे. त्यामुळे नियमित सकाळ-संध्याकाळ दोन वेळची मिळणारी एसटी सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी वांजळे गावाकडून केली जात आहे.

मागील दिवसात प्रवाशांचा प्रतिसाद कमी मिळाल्याने एसटी सेवा बंद झाली. आता मागणीनुसार वांजळे एसटी सुरू करण्यात येईल.

शर्वरी लांजेकर, आगारप्रमुख, श्रीवर्धन
Exit mobile version