महिलांना मिळाले हक्काचे व्यासपीठ

नगर परिषदेतर्फे आत्मविश्‍वास वाढविण्यास मदत
। अलिबाग । वर्षा मेहता ।

सध्या देशात व राज्यात नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे. नवरात्र उत्सव म्हणजे नारी शक्तीचा जागर व सन्मान करण्याचा उत्सव. सध्या सगळ्या क्षेत्रात महिला अग्रेसर आहेतच पण अजुनही अशा अनेक महिला आहेत, ज्या स्वतःच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठाच्या शोधात आहेत. आता अलिबागच्या महिलांना अलिबाग नगर परिषद मार्फत अलिबाग शहर उपजीविका केंद्र उपलब्ध करुन दिले आहे. हे उपजीविका केंद्र अनेक महिलांसाठी व्यासपीठ बनले आहे, काहींना या केंद्रामुळे आत्मविश्‍वास मिळाला आहे.
दीनदयाल अंत्योदय योजने अंतर्गत अलिबाग नगर परिषदेने महिला उपजीविका केंद्र उपलब्ध करुन दिले आहे. आजीविका राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन (NRLM) जून 2011 मध्ये भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने (MORD) सुरू केले होते. नोव्हेंबर 2015 मध्ये या कार्यक्रमाचे नाव बदलून दीनदयाल अंत्योदय योजना (DAY-NRLM) करण्यात आले. या योजनेंतर्गत अलिबाग नगर परिषदेने 33 बचत गट महिला समुहांना उपजीविका केंद्र उपलब्ध करुन दिले आहे. एका वेळी 12 बचतगट दुकाने लाऊ शकतात व प्रत्येक बचतगटाला बदलत्या क्रमानुसार संधी देण्यात येईल अशी माहिती प्राची पाटील यांनी दिली.

Exit mobile version