अलिबाग प्रेस असोसिएशनच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या, मात्र कधीही प्रकाश झोतात न येणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा शनिवारी (दि.7) अलिबागमध्ये सन्मान करण्यात आला. अलिबाग प्रेस असोसिएशनच्या वतीने पाच महिलांना तेजस्विनी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल, यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कारमुर्तींना सन्मानित करण्यात आले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत हा कार्यक्रम अलिबागमधील पोलीस मुख्यालयाच्या जंजिरा सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाच्या प्रकल्प संचालक, शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पुर्वा पाटील, अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनावडेकर, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, तपस्वी गोंधळी, सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर, सन्मानमुर्ती व नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी व्यावसायिक क्षेत्रात काम करणाऱ्या वंदना विजय सुर्वे, देविका देवेंद्र पाबेकर, प्राची विवेक देवळे, पोलीस दलात वाहतूक कर्मचारी म्हणून सेवा देणाऱ्या प्रियांका अमोल घरत, तसेच अगदी कमी वयात समुद्र पार करणाऱ्या सारा अभिजीत वर्तक या महिलांना तेजस्वीनी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी पोलीस अधीक्षक आंचल दलाल म्हणाल्या की, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना निवडून तेजस्विनी पुरस्कार देण्याचा स्तुत्य उपक्रम अलिबाग प्रेस असोसिएशनने सुुरू केला आहे. या निमित्ताने महिलांचा सन्मान करण्याचे काम असोसिशनच्या माध्यमातून होत आहे. या पुरस्कारच्या माध्यमातून महिलांना उभारी देण्याचे कार्य संस्था करीत आहे. लग्नानंतर सासरचे नाव महिलेला मिळते. परंतु आई, वडीलांकडून मिळालेल्या संस्कारातून संगोपनातून महिला समाजात नाव उंचावण्याचे काम करीत असतात. महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुलेसह अनेक महिलांचे कार्य आदर्श घेण्यासारखे आहे. या भूमीत मला पोलीस अधीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. कर्मभूमी म्हणून स्विकार केल्याचा आनंद आहे, असे पोलीस अधीक्षक आंचल दलाल म्हणाल्या.
यावेळी ग्रामीण विकास यंत्रणा, रायगडच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे तसेच शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पुर्वा पाटील यांनी देखील मोलाचे मार्गदर्शन केले.







