संसदेतही महिला खासदारांचे शोषण: सुप्रिया सुळे

| मुंबई | प्रतिनिधी |

समाजातील सर्व महिलांच्या समस्या सारख्याच असतात. संसदेत महिलांचे शोषण होत नाही, असे अनेकांना वाटते. मात्र, ते खरे नाही. संसदेतही महिला खासदारांचे शोषण होते. त्याचे प्रकार वेगवेगळे असतात. ते महाविद्यालयातील रॅगिंगसारखे नसते. व्यक्तिनुरूप त्याची व्याख्या बदलते. महिलांना साड्यांच्या रंगावरून दिलेल्या प्रतिक्रिया यादेखील शोषणाचाच एक प्रकार आहे. महिलांकडून पुरुषांचे केस, कपडे याबाबत टिपण्णी केली जात नाही. मात्र, पुरुषांकडून सर्रासपणे केली जाते. पुरुषांनी कामाच्या ठिकाणी व्यावसायिक पद्धतीचे वागणे ठेवायला हवे, असे ठाम मत राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी रविवारी व्यक्त केले.

आंतरराष्ट्रीय महिला परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील महिला पत्रकारांचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. पुढे बोलताना खा. सुळे यांनी, पुरुषांच्या चुकीच्या वृत्तीवर बोट ठेवताना त्यांच्या आयुष्यातील पुरुषांचे स्थानही अधोरेखित केले. माझ्या आयुष्यातील सर्व मोठे निर्णय पुरुषांनीच घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मताधिकार दिला. जोतिबा फुले यांनी पुढाकार घेतला तेव्हा सावित्रीबाई शिक्षित झाल्या, अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे प्रत्येक पुरुष वाईट नसतो, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Exit mobile version