| वेणगाव | वार्ताहर |
स्त्रियांनी स्वतःला कमजोर समजू नका, एका स्त्रीच्या अंगी दहा हत्तीचे बळ असते, तर संकटसमयी ती आपल्या परिवाराचे कवच बनून उभी राहते, असे प्रतिपादन सद्भावना फाऊंडेशनच्या प्रकल्प अधिकारी सुनंदा लाड यांनी जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात बोलताना केले.
सद्भावना फाऊंडेशन मुंबई, शाखा कर्जत यांच्या वतीने ब्राह्मण सभागृह कर्जत येथे जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी (दि. 26 ) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास नाबार्डचे डीडीएम प्रदीप अपसुदे, बँक ऑफ महाराष्ट्र बँक मॅनेजर स्नेहल, प्रकल्प अधिकारी सुनंदा लाड उपस्थित होते.
सुनंदा लाड पुढे म्हणाल्या की, आजची स्री ही पुरुषांच्या बरोबर हरएक क्षेत्रात खांद्याला खांदा लावून पुढे जात आहे, स्वतःला कमजोर समजू नका, सद्भावना फाऊंडेशन ही एक सेवाभावी संघटना बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचे काम करीत आहे, आपल्या अंगी असलेले चांगले गुण ओळखून महिलेने पुढे आले पाहिजे.
नाबार्डच्या अंतर्गत महिलांना दिल्या जाणार्या प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाची माहिती अतिशय साध्या व सोप्या भाषेत प्रदीप अपसुंदे यांनी दिली, तर बँकेचे व्याजदर, बँकतर्फे राबवण्यात येणार्या विविध योजनांची माहिती यावेळी बँक मॅनेजर स्नेहल मॅडम यांनी उपस्थित महिलांना दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सद्भाव फाऊंडेशनच्या प्रगती पाटील, सुनीता जाधव (शिवणकाम शिक्षिका), प्रवीण पाटील, जयश्री गरुड, ज्योती बोराडे यांनी सहकार्य केले.