। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाची बांधिलकी गोरगरीब, शेतकरी, कष्टकर्यांंशी राहिली आहे. सावित्रीबाई फुले या आपला आदर्श आहेत. अनेक अडचणींवर मात करीत त्यांनी मुलींच्या शिक्षणाचा पाया रोवला. तोच विचार घेत आपण मुलींसाठी सायकल देऊन त्यांच्या शिक्षणाला गती देण्याचा प्रयत्न केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन पुढे जाण्याची गरज आहे. महिला बचत गटांना उभारी देण्याचा मानस आहे. प्रत्येक विभागात बचत गट उभारण्याचा प्रयत्न राहणार आहे. महिलांच्या हाताला काम देण्याचे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महिलांनी एक होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केले.
रायगड जिल्हा महिला बचतगट फेडरेशन पुरस्कृत लेक शिवबाची अंतर्गत महिला संवाद मेळावा कुरुळ येथील क्षात्रैक्य माळी समाज हॉलमध्ये मंगळवारी (दि.15) आयोजित करण्यात आला. यावेळी चित्रलेखा पाटील बोलत होत्या. रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा तथा अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे, रायगड जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या उपाध्यक्षा वृषाली ठोसर, संजना कीर, नगरपरिषदेच्या माजी नगरसेवक, ग्रामपंचायतीच्या आजी-माजी सरपंच, सदस्य, महिला आघाडीच्या पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, रायगड जिल्हा महिला बचत गट फेरडेशनची लोकप्रियता वाढली आहे. महिलांकडून या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. महिला एकजूट, सक्षम झाल्या पाहिजे, शिवबाच्या लेकी म्हणून पुढे चालले पाहिजे, या भूमिकेतून हा मेळावा रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन माजी आ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भरविण्यात आला आहे. महिला अनेक संकटांशी सामना करीत संसार, समाज चालवित आहे. तिच्यामध्ये असलेली जिद्द व सातत्यामुळे हे शक्य होत आहे.
राजकारण, अर्थकारण, समाजकारणात महिलांचे म्हणणे असावे ही भूमिका आहे. तरुण व्यसनापासून दूर राहण्यासाठी महिलांनी काम केले पाहिजे. तरच समाजात आमूलाग्र बदल होईल. पंधरा ते वीस हजार रुपये कमविण्याचे बळ महिलांना स्वतःच्या पायावर मिळाले पाहिजे. या मेळाव्यातून महाराजांचे विचार घेऊन महिलांनी पुढे जाण्याची गरज आहे. या भूमिकेतून महिलांनी काम केले पाहिजे, असे पाटील म्हणाल्या.
महिलांनी संघटनात्मक काम करावे : अॅड. मानसी म्हात्रे
सध्या महिला सुरक्षित नाही, स्वावलंबी नाही. महिलांना रोजगार, स्वयंरोजगार नाही. ही दारे खुली करण्यासाठी संघटितपणे साखळी तयार करावी लागेल. अन्यायाविरोधात संघटितपणे लढावे लागणार आहे. महिलांना न्याय देण्याचे काम शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या माध्यमातून केले आहे. त्यामुळे पाठीराखा कोण असावा याचा विचार करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी संघटनात्मक काम करणे महत्त्वाचे आहे, असे आवाहन शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे यांनी केले.
त्या पुढे म्हणाल्या, गेल्या अनेक दिवसांपासून मेळावे भरविण्यात आले आहेत. या मेळाव्यातून महिलांना ऊर्जा, बळ मिळाले आहे. महिलांना संघटित करण्यासाठी संकल्पना निर्माण केली. त्या संघटनेतून ऊर्जेचा स्त्रोत निर्माण होणार आहे. त्यामुळे शिवबाच्या लेकी आता जग जिंकणार असल्याची आशा निर्माण झाली आहे. सहा महिन्यांत समाजाची परिस्थिती भयावह आहे. महिलांवर अत्याचार केले जात आहेत. महिलांना रोजगारापासून परावृत्त केले जात आहे.असंख्य महिलांना फसविले जाते. प्रत्येक निर्णयापासून महिलांना दुर्लक्षित केले जाते. महिला ज्या ठिकाणी काम करतात, त्या ठिकाणी त्यांची अडवणूक केली जाते. त्यासाठी महिलांना संघटन करण्याची गरज आहे. हजारो महिला बचतगट फेडरेशनच्या माध्यमातून काम करीत आहेत. महिलांची साखळी जोडली, तर सर्व संकटांवर मात करू शकतो. महिलांना प्रत्येक व्यवसायात हक्काची पदे द्या, हाताला कामाला द्या, सशक्त करा, निर्भय, स्वयंपूर्ण करा, ही मागणी आहे. सध्या देशात, राज्या, जिल्ह्यात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. महिला अत्याचाराचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. महिलांची फसवणूक केली जाते. रुग्णालयात काम करणार्या परिचारिकांना कायम करण्यासाठी फसवण्यात आले होते. त्यासाठी महिला एकत्र आल्या पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
















