जिल्हा रुग्णालयातील प्रसूती कक्षात बेडसाठी महिलांची वेटिंग

वर्‍हांड्यात गादी टाकून रुग्णांवर उपचार
समस्या सोडविण्यात जिल्हा शल्यचिकित्सक अपयशी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कोव्हिड काळात मोठ्या प्रमाणावर रुग्णसेवेवर पैसा खर्च केल्याचा आव आणणार्‍या आरोग्य विभागाच्या गैरकारभाराची लक्तरे चव्हाट्यावर आली आहेत. जिल्हा रुग्णालयात प्रसूती विभागातील महिलांवर जमिनीवर झोपवून उपचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूतीसाठी येणार्‍या गरोदर मातांची संख्या दिवसेंदिवस लक्षणीय वाढू लागली आहे. त्यामुळे प्रसूती कक्ष हे अपुरे पडत असल्याने गरोदर माताना खाली जमिनीवर उपचार घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे प्रसूती कक्ष वाढवून त्याठिकाणी बेडची संख्या वाढवावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली जात आहे.
जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना आरोग्यसेवेचा लाभ मिळावा, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये व जिल्हा रुग्णालय अशी यंत्रणा उभारण्यात आलेली आहे. त्यातही तज्ज्ञ वैद्यकीय अधिकार्‍यांच्या उपचाराची सुविधा मिळण्यासाठी जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक हे प्रामुख्याने जिल्हा रुग्णालयावर अवलंबून असतात.
रायगड जिल्ह्यातून हजारो रुग्ण हे आजारावरील उपचारासाठी अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात येतात. जिल्हा सामान्य रुग्णालयातील पहिल्या मजल्यावर प्रसूती आणि नवजात मुलाचे कक्ष आहे. या कक्षात 42 बेडची संख्या आहे. असे असले तरी दररोज 20 ते 22 नवीन रुग्ण दाखल होत आहेत. त्यामुळे बेड संख्या कमी आणि गरोदर मातांची संख्या जास्त होत आहे. याचा ताण प्रशासनावर पडत आहे. बेड नसल्याने आणि कक्ष अपुरा पडत असल्याने गरोदर मातांना खाली गादी टाकून त्यावर झोपवले जात आहे.खासगी दवाखान्यात प्रसूती झाल्यावर अवाच्या सव्वा बिल रुग्णाच्या नातेवाईकांकडून आकारले जाते. खासगी रुग्णालयातील उपचारांचा खर्च परवडत नसल्यामुळे नाईलाजास्तव रुग्णांना तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागत आहे. रोज वाढत असलेली गरोदर मातांची संख्या पाहता प्रसूती कक्ष हा अपुरा पडत आहे. तर दुसरीकडे या कक्षाच्या बाहेरील भिंतीचे काम सुरू असल्याने आतील भागातील रुग्णांना दुसरीकडे हलविले आहे. याचाही परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे प्रसूती कक्ष हा वाढवून त्यातील बेड संख्या वाढविणे अंत्यत गरजेचे आहे. याबाबत प्रशासनाने हालचाल करून ही समस्या सोडविण्यासाठी उपययोजना करणे महत्वाचे आहे.

प्रसूती कक्ष हाऊसफुल्ल
रुग्णालयातील विविध कक्षातील स्लॅब तसेच प्लास्टर कोसळणे, इमारतीचा सज्जा पडणे अशा अनेक घटना घडत आहेत. दरम्यान, रुग्णालय स्थलांतराच्या हालचाली जोरदार सुरू आहेत. त्यातच रुणालयातील एक महत्त्वाचा विभाग म्हणून प्रसूती कक्षाकडे पाहिले जाते. मात्र रुग्णांची सख्या पाहता बेड अपुरे पडत असल्याने सध्याच्या घडीला हा कक्ष हाऊसफुल्ल झाला आहे.

प्रसूती कक्षात गरोदर मातांची संख्या वाढली आहे. रुग्ण संख्या वाढली असली तरी रुग्णाची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. लवकरच ही समस्या सोडविली जाईल. फायर ऑडिट आणि सुरक्षिततेचे काम सुरू आहे त्यामुळे इतर वॉर्ड रिकामे करण्यात आल्याने जागा अपुरी पडत आहे.
डॉ. सुहास माने, जिल्हा शल्य चिकित्सक, अलिबाग

Exit mobile version