। अलिबाग । प्रतिनिधी ।
सध्याचे राजकारण भयावह आहे. आवाज उठविणार्या सर्वसामान्यांवर दबावतंत्र वापरला जातो. या मतदारसंघातील नागरिकांनी खूप सोसले आहे. पिळवणूक व छळवणूक करण्याबरोबरच हुकूमशाहीविरोधात लढण्याची ही वेळ आली आहे. आता नवीन बदल घडवून आण्यासाठी महिलांनी पुढे येण्याची गरज आहे. ही क्रांती महिलाच करू शकतात, असा विश्वास शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केला. रायगड जिल्हा महिला बचत गट फेडरेशन पुरस्कृत लेक शिवबाची अंतर्गत भव्य महिला मेळावा गुरुवारी (दि.10) परहूर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा प्रांगणात आयोजित करण्यात आला. यावेळी पाटील बोलत होत्या.
यावेळी रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा, अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, रायगड जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या उपाध्यक्षा तथा अलिबाग नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका वृषाली ठोसर, शेकाप राज्य विद्यार्थी संघटना अध्यक्षा साम्या कोरडे, मुळेच्या सरपंच रोहिनी पाटील, स्वाती नागावकर, अजिता गावंड, शेकाप अलिबाग तालुका महिला आघाडी उपाध्यक्षा रोशनी मोकल, सदस्या नागेश्वरी हेमाडे, सुकन्या साखरकर, विजया पाटील, मंगला गजणे आदी मान्यवरांसह शेकाप महिला आघाडीच्या पदाधिकारी, सदस्या, महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
याप्रसंगी चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, सध्या बदलत्या समाजकारण व राजकारणामुळे परिस्थिती भयावह झाली आहे. महिलांच्या सुरक्षेचा, रोजगाराचा प्रश्नदेखील गंभीर आहे. याकडे सरकार गांभीर्याने लक्ष देत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. समाजाचा विकास महिलाच करू शकते. समाजाची खरी ताकद ही महिला आहे. त्यामुळे महिलांनी राजकारण, समाजकारण, अर्थकारण यावर विचार करण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करून पसरत असलेल्या दहशत, हुकूमशाहीविरोधात आवाज महिलांनी उठविला पाहिजे. तरच समाजात अमूलाग्र बदल होईल, असे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.
त्यांनी पुढे सांगितले, निवडणुका समोर ठेवून मते मिळविण्यासाठी फसवणुकीचा डाव सरकार आखत आहे. परंतु, महिला जितक्या संयमी, शांत आहेत, तितक्या वेळप्रसंगी रुद्र रुप धारण करून फसविणार्या सरकारला आपली जागा दाखवेल. महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी पंधरा हजार रुपये कमविण्याची ताकद निर्माण करून द्या, ही शेतकरी कामगार पक्षाची भूमिका आहे.
या भागात योग्य ते नेत्वृत्व मिळाले नसल्याने येथील गावे, वाड्यांचा विकास रखडला आहे. नोकरी, रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे. थळमध्ये आरसीएफ कंपनी आहे. या कंपनीसाठी येथील शेतकर्यांकडून जागा घेतली. परंतु, अनेक स्थानिक नोकरीपासून वंचित आहेत. ही चिंतेची बाब आहे. शेकापच्या नेत्या माजी राज्यमंत्री स्व. मीनाक्षी पाटील यांनी आगरी, कोळी समाजाचे जीवन सुखी करण्यासाठी प्रयत्न केले. या भागात अनेक योजना राबवून त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला. मी निवडून आल्यावर येथील कोळी व इतर समाजाचे प्रश्न मार्गी लावणार, आरसीएफमार्फत स्थानिक तथा भूमीपुत्रांना नोकरी देणार, तसेच हुकूमशाहीविरोधात लढा देणार, अशी ग्वाही चित्रलेखा पाटील यांनी दिली.