। अलिबाग । प्रतिनिधी ।
निवडणुका समोर ठेवून सरकारने लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये दिले. परंतु, दुसर्या बाजूला कांदा, बटाट्यासह दैनंदिन व्यवहारातील वस्तूंमध्ये भरमसाठ वाढ केली आहे. वाढती महागाई, न मिळालेल्या नोकर्या त्यामुळे महिलावर्गात प्रचंड संताप निर्माण झाला आहे. या जुलमी सरकारविरोधात आगामी निवडणुकीतून संताप व्यक्त केला जाणार आहे. विरोधकांना घरी बसवून चित्रलेखा पाटील यांना भरघोस मतांनी निवडून देतील, असा विश्वास शेकाप राज्य विद्यार्थी संघटना अध्यक्षा साम्या कोरडे यांनी व्यक्त केला.
पुढे त्या म्हणाल्या, हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारे नसून, जुलमी राजांच्या विचारांचे आहे. या राज्यात महिला सुरक्षित नाहीत. या भागात नोकरीसह वीज, पाण्याचा प्रश्न आहे. त्याची सोडवणूक करण्यास विद्यमान आमदार अपयशी ठरले आहेत. चांगले सरकार व चांगले मुख्यमंत्री असणे आवश्यक आहे. त्यासाठी चित्रलेखा पाटील यांच्यासारखे उमेदवार आमदार म्हणून विधानसभेत पाठविण्याची गरज आहे. जुलमी सरकारविरोधात मते देऊन शिवबाची लेक चित्रलेखा पाटील यांनाच मतदान करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मान्यवरांचे जल्लोषात स्वागत
परहूर येथे महिला संवाद मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने महिलांनी गर्दी केली होती. चित्रलेखा पाटील यांचे कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन होताच फुलांचा वर्षाव करीत उभे राहून महिलांनी त्यांचे स्वागत केले. प्रारंभ प्रवेशद्वारासमोर त्यांचे औक्षण करण्यात आले.
महिलांचा सन्मानपत्र देऊन गौरव
महिला संवाद मेळाव्याच्या निमित्ताने पंचक्रोशीतील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक, व्यावसायिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या विभागातील तीसहून अधिक महिलांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
स्व. मीनाक्षी पाटील यांना श्रद्धांजली
रायगड जिल्हा महिला बचतगट फेडरेशन पुरस्कृत महिला मेळावा भरविण्यात आला. या मेळाव्याच्या दरम्यान शेकापच्या नेत्या, रायगडच्या रणरागिणी, बुलंद आवाज माजी राज्यमंत्री स्व. मीनाक्षी पाटील यांना सर्वांनी उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच उद्योजक रतन टाटा यांनादेखील यावेळी श्रद्धांजली अर्पण केली.