महिलांच्या कर्तृत्वाला योग्य व्यासपीठाची गरज

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| मुंबई | प्रतिनिधी |

महिलांच्या कला, सृजनशीलता आणि कर्तृत्वाला योग्य व्यासपीठ मिळणे आवश्यक असून महिलांच्या प्रतिभेला सजगतेने ओळख देणे गरजेचे आहे, असे मत सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी व्यक्त केले. मुंबईतील पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे आयोजित महिला कला महोत्सव 2026 च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य महिला आयोगच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, ज्येष्ठ गायिका पद्मश्री अश्विनी भिडे-देशपांडे, राजश्री कुलकर्णी, नृत्यांगना सोनिया परचुरे, पुढारी मल्टीमीडियाच्या संपादक मृणालिनी नानिवडेकर, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर, विविध क्षेत्रातील कलाकार, साहित्यिक आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे नूतनीकरण झाल्यानंतर अवघ्या एका वर्षात येथे सुमारे एक हजाराहून अधिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. हे प्रांगण कलाकारांसाठी कला आविष्काराचा महायज्ञ ठरले असून येथे प्रत्येकाला आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्याची संधी मिळत आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना ॲड. शेलार यांनी सांगितले की, महिला दिन केवळ शुभेच्छांपुरता मर्यादित न राहता महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्याचा आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचा दिवस आहे. समाजाने आपल्या घरात, कुटुंबात आणि परिसरात महिलांची प्रतिभा आणि क्षमता ओळखून त्यांना पुढे येण्यासाठी संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

Exit mobile version