| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा आणि त्यांना स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी सक्षम व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने दैनिक कृषीवलने नागावमधील सायरस पुनावाला स्कूलच्या मैदानात शुक्रवारी (दि.27) नागाव-आक्षी महिला प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. कृषीवलने उचललेले हे पाऊल केवळ क्रीडा स्पर्धेपुरते मर्यादित न राहता, महिला सक्षमीकरणाच्या चळवळीला नवे बळ देणारे ठरले आहे. पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांच्या पुरस्कारातून आणि कृषीवल संपादक माधवी सावंत, ॲड. नम्रता नाईक, ॲड. मंजिरी सावंत यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या या स्पर्धेने जिल्ह्यात एक वेगळाच उत्साह निर्माण केला.
नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर, आक्षीच्या सरपंच रश्मी पाटील, ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या सक्रिय सहकार्यामुळे या भव्य स्पर्धेचे यशस्वी आयोजन शक्य झाले. या नागाव-आक्षी महिला प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन अलिबाग नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांच्या हस्ते पार पडले. या स्पर्धेत नागाव व आक्षी गावांतील महिला संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपली क्रीडाप्रतिभा दाखवून दिली. पारंपरिक चौकटीबाहेर पडत महिलांनी मैदानात उतरून जिद्द, संघभावना आणि आत्मविश्वासाचा उत्कृष्ट नमुना सादर केला. प्रत्येक सामन्यात खेळाडूंनी दाखवलेली चुरस, प्रेक्षकांनी दिलेला भरभरून प्रतिसाद आणि मैदानावर निर्माण झालेला जल्लोष यामुळे संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.
स्पर्धेत आक्षी व नागाव परिसरातील एकूण दहा संघांनी सहभाग घेतला होता. त्यात स्वराज्य आक्षी, नागाव जीम, साईसेवक आक्षी, श्रीगणेश कोठारभाट, शिव बाप्पा महिला मंडळ, दर्यावर्दी वॉरियर्स, सहेली गृप, सायरस पुनावाला स्कुल, मरीआई हटाळे व शास्त्रीनगर या महिला संघांचा समावेश होता. या स्पर्धेतील अंतिम सामना श्रीगणेश कोठारभाट व सायरस पुनावाला स्कुल यांच्यात झाला. या अतितटीच्या सामन्यात कोटारभाट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतले. त्यामुळे सायरस पुनावाला संघाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. त्यांनी मर्यादित सहा षटकांत 35 धावसंख्या उभारली. त्यानंतर सायरस पुनावाला संघाने दिलेले लक्ष श्रीगणेश कोटारभाट संघाने अवघ्या 4 षटकांत पुर्ण करत प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे सायरस पुनावाला स्कुलला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. तर, स्वराज्य आक्षी संघाने तृतीय क्रमांक पटकावला. त्याचबरोबर या स्पर्धेतील मालिकावीर म्हणून सायरस पुनावाला संघातील सोनाली पाटील या ठरल्या. तसेच, उत्कृष्ट फलंदाज आणि सामनावीर म्हणून कृषीवलच्या संपादक माधवी सावंत या ठरल्या. तर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून स्वराज्य आक्षी संघातील तनू यांनी बहूमान मिळविला.
दरम्यान, स्थानिक पातळीवर महिलांना मिळालेल्या या संधीमुळे त्यांच्या आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाली असून, भविष्यात अशा उपक्रमांमुळे अधिकाधिक महिला क्रीडा क्षेत्रात पुढे येतील, अशी आशा व्यक्त होत आहे. कृषीवलचे सहयोगी संपादक सुयोग आंग्रे, वरिष्ठ उपसंपादक राकेश लोहार, उपसंपादक संतोष राऊळ, कला संपादक केदार गुरव, वैष्णवी वाडकर यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. तसेच, पंच म्हणून नितिन सारंग, सुयोग चोगले आणि आयुष चोगले यांनी चोख कामगिरी बजावली.
यावेळी नागाव उपसरपंच मंगला नागे, सदस्य प्रियंका काठे, निकिता पाडेकरी, आक्षी सदस्य निरजा नाईक, रविंद्र पाटील यांच्यासह क्रिकेटप्रेमी आदींच्या उपस्थितीतील ही स्पर्धा केवळ क्रिकेटपुरती मर्यादित न राहता, महिलांच्या हक्क, क्षमता आणि स्वाभिमानाला बळ देणारा एक प्रभावी मंच ठरली आहे. कृषीवलने घेतलेला हा उपक्रम समाजात सकारात्मक बदल घडवणारा ठरत असून, महिला सक्षमीकरणाच्या दिशेने उचललेले हे पाऊल निश्चितच प्रेरणादायी मानले जात आहे.
