कर्तृत्ववान महिलांचा गौरव, मराठमोळ्या फॅशन शो ने वेधले लक्ष
| अलिबाग | ओमकार नागावकर |
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून चौल-रेवदंडा परिसरातील महिलांसाठी आयोजित महिला दिन महोत्सव 2026 – पर्व 2 हा भव्य आणि दिमाखदार सोहळा रविवारी (दि.8) सायंकाळी 6.30 वाजता रेवदंडा येथील एस.आर.टी. हायस्कूल मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला. महिला सन्मान, आत्मविश्वास, कला आणि संस्कृतीचा संगम घडवणारा हा कार्यक्रम परिसरातील नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
यावेळी समाजात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सरोज वरसोलकर, रिया झावरे, रेखा घरत, नूरजहा हुसेन बुऱ्हान, अश्विनी राऊत, हर्षदा धुमाळ या कर्तृत्ववान महिलांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्याचा गौरव करताना उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या कर्तृत्वाची दखल घेत त्यांचे कौतुक केले. या सन्मानामुळे उपस्थित महिलांमध्ये नव्या आत्मविश्वासाची आणि प्रेरणेची भावना निर्माण झाली. या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, सोनाली मोरे, माजी सरपंच रूपाली म्हात्रे तसेच नागाव ग्रामपंचायत सरपंच हर्षदा मयेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरला तो रायगड जिल्ह्यातील 11 प्रसिद्ध मॉडेल्सचा मराठमोळा फॅशन शो. पारंपरिक मराठी वेशभूषा, दागिने आणि संस्कृतीची सुंदर झलक या फॅशन शोमधून पाहायला मिळाली. चौल-रेवदंडा परिसरात प्रथमच असा आगळावेगळा फॅशन शो सादर झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि उत्साह दिसून आला. या फॅशन शोचे दिग्दर्शन आंतरराष्ट्रीय कोरिओग्राफर जयेश पाटील यांनी केले. मॉडेल्सचा आकर्षक हेअर व मेकअप ‘युगाज सलोन’, रेवदंडा पारनाका यांनी केला, तर कलाधरा ज्वेलरीतर्फे दागिन्यांची सजावट करण्यात आली. तसेच कॉस्टयूम डिझायनर लक्ष्मी मुकादम यांनी तयार केलेल्या पारंपरिक पोशाखांनाही प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली.
कार्यक्रमात मनोरंजनाची रंगत वाढवण्यासाठी झी युवा फेम प्रतिम सुतार यांचा लोकप्रिय आणि खेळकर ‘होम मिनिस्टर’ हा उपक्रमही मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रमाची रंगत वाढवली. स्पर्धेतील तिन्ही विजेत्यांना आकर्षक पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. हा भव्य महिला दिन महोत्सव पल्लवी म्हात्रे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला असून, कार्यक्रमाचे मॅनेजमेंट हेड अमित म्हात्रे होते. महिलांचा सन्मान, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे आणि समाजातील महिलांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित केल्याचे आयोजकांनी सांगितले. चौल-रेवदंडा परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महिला दिनाचा उत्सव आनंदात साजरा केला.







