शुद्ध व नियमित पाण्यासाठी महिलांचा जिल्हा परिषदेवर हंडा मोर्चा

पनवेल-गुळसुंदे ग्रामस्थांना अशुद्ध अपुरे पाणी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जिल्हा परिषदेच्या 52 वर्ष बंद पडलेल्या चावणे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाताळगंगा नदीतून पनवेल तालुक्यातील गुळसुंदे ग्रामपंचायत हद्दीत अशुद्ध पाणी सोडले जात आहे. अशुद्ध पाणी सोडूनही तेही आठवड्यातून केवळ एक दोन वेळा अर्धा तास पाणी सोडले जाते. याविरोधात आज जिल्हा परिषदेवर गुळसुंदे हद्दीतील महिलांनी हंडा मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. आम्हाला शुद्ध आणि नियमित पाणी द्या अशी मागणी या महिलांनी केली आहे. अन्यथा 17 नोव्हेंबरपासून जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाला बसू असा इशारा निवेदनातून या संतप्त महिलांनी दिला आहे. राष्ट्र सेवा दल रायगडचे संघटक संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांचा हंडामोर्चा काढण्यात आला होता.
गुळसुंदे येथील महिलांचा हंडा मोर्चा अलिबाग शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून निघाला. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत हा मोर्चा जिल्हा परिषडकडे निघाला. जिल्हा परिषद कार्यालयाआधी पोस्ट कार्यालयाजवळ पोलिसांनी मोर्चा अडवला. त्यानंतर तिथेच महिलांनी ठिय्या मांडला. जिल्हा परिषदेच्या पाणी योजनेतून येत असलेले पाणी हे अशुद्ध येत आहे. कोणताही जलशुद्धीकरण प्रकल्प नसल्याने जंतू, मासळी, गडूळ पाणी येथील नागरिकांना प्यावे लागत आहे. अशुद्ध पाणी प्यायल्याने अनेकांना व्याधी जडत आहेत. मात्र याकडे जिल्हा परिषदेच्या आरोग्य आणि पाणी विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अशुद्ध पाणी येत असल्याने विकत पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना आर्थिक भुर्दंड ही सोसावा लागत आहे. त्यामुळे येथील महिला वर्ग हा प्रचंड संतप्त झाला आहे.
केंद्राच्या जलजीवन योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला शुद्ध 55 लिटर पाणी मिळावे यासाठी योजना जिल्ह्यात राबवली गेली आहे. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने फक्त नळ दिले असून शुद्ध पाणी देण्याबाबत अपयशी ठरले आहेत. त्यामुळे कागदोपत्री ही योजना जिल्ह्यात प्रशासनाने यशस्वी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गुळसुंदे ग्रामस्थांनीही पाण्यासाठी निवेदन, आंदोलने केली मात्र अद्यापही येथील नागरिकांना अशुद्ध पाणीच प्यावे लागत आहे.


यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी आश्‍वासन देत चावणे जलशुद्धीकरण प्रकल्पावर दोन कामगारांची तात्काळ नेमणूक करण्यात येईल. जल जीवन मिशन मधील प्रस्तावित योजनेसाठी ग्रामपंचायतीकडून लवकरात लवकर नाहरकत पत्र घेण्यासंबंधीची कारवाई करण्यात येईल. पाणी वापराबाबत मीटर बसवण्यात येतील तसेच जलशुद्धीकरण प्रक्रिया करण्यात येईल. पाणी वितरणाबाबतचे वेळापत्रक तयार करून सर्व गावांमध्ये त्या वेळेनुसार पाणी पुरवठा करण्यात येईल. एमआयडीसीच्या पाण्यासाठी पुढील पाठपुरावा करण्यात येईल. 3 वर्षे रखडलेल्या लाडीवली आकुलवाडी लाईनचे काम तात्काळ पूर्ण करणार असल्याची माहिती राष्ट्र सेवा दल रायगडचे संघटक संतोष ठाकूर यांनी दिली.

Exit mobile version