महिला हॉकी संघ सेमीफायनलमध्ये

बलाढ्य ऑस्ट्रेलियाला चारली धूळ
| टोक्या | वृत्तसंस्था |
भारतीय महिला हॉकी संघाने तीन वेळा चॅम्पियन ठरलेल्या बलाढ्य ऑस्टेलियाला क्वार्टर फायनलमध्ये धूळ चारत सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला कडवी झुंज देत चारीमुंड्या चीत करीत 1-0 असा पराभव केला. गुरजीत कौरच्या एकमेव गोलच्या बळावर भारतीय संघाने हा ऐतिहासिक विजय साकारत पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.

या सामन्यात भारताची गोलकिपर सवितानं जबरदस्त खेळाचं प्रदर्शन केलं. सवितानं ऑस्ट्रेलियाचं मजबूत आक्रमण अनेकदा परतवून लावलं. विशेष म्हणजे पेनाल्टी क़ॉर्नरवर तिने केलेला बचाव हा वाखाणण्याजोगाच होता. भारतीय महिला हॉकी संघाने आपल्या भारदस्त संरक्षण आणि आक्रमक अ‍ॅटकचं प्रदर्शन आजच्या सामन्यात दाखवलं. बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 1-0 ने हरवून भारताने बाजी मारली. गुरजीतने विजयी गोल डागला तर गोलकीपर सविताने भिंत बनून ऑस्ट्रेलियाचे हल्ले परतवून लावले.

उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धचा सामना भारतीय महिलांसाठी कठीण मानला जात होता. दिग्गज आणि तज्ज्ञांच्या मते ऑस्ट्रेलिया संघ अधिक बलाढ्य मानला जात होता. याआधी तीन वेळेस ऑलिम्पिक जिंकणार्‍या ऑस्ट्रेलिया संघाने यंदाही ग्रुप स्टेजमध्ये केवळ एकच गोल खाल्ला होता. तर दुसरीकडे भारतीय महिला संघ ग्रुप स्टेजमध्ये 7 गोल खाऊन उपांत्य पूर्व फेरीत पोहोचली होती. पण या सामन्यातील 4 क्वार्टरमध्ये 60 मिनिटांपर्यंत अप्रतिम हॉकीचे दर्शन घडवत भारतीय महिलांनी विजयश्री मिळवला. आता सेमीफायनलमध्ये भारताचा सामना 4 ऑगस्ट रोजी अर्जेंटिनाशी होणार आहे.

Exit mobile version