2 मार्च रोजी प्रांत कार्यालयावर धडकणार
। पेण । वार्ताहर ।
रायगडातील पेणमध्ये सर्वाधिक पाऊस पडत असतानादेखील प्रत्येक वर्षी सहा-सहा महिने तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. खारेपाट विभागात नियमित शुद्ध पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, हेटवणे धरण, शहापाडा धरण व इतर पाणीसाठे यांचे पाणी येथील नागरिकांना पिण्यासाठी, वापरासाठी व शेतीसाठी पुरेशा प्रमाणात मिळावे, ही किमान मागणी आहे. या व इतर अनेक मागण्यांसंदर्भात महिला आंदोलन 2 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता आंदोलन करण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौक, पेण येथून महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत महिलांची रॅली पुढे प्रांत कार्यालयात जाईल. पेण प्रांत कार्यालयात या रॅलीचे रूपांतर ठिय्या आंदोलनात होणार आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या मोहिनी गोरे यांनी दिली आहे. महिला आंदोलनात सहभाग व पाठिंबा अनेक संघटनांनी दिला आहे. त्यामध्ये खारेपाट विकास संकल्प समिती, ठाकूर बेडी महिला बचत गट, वढाव पंचक्रोशी महिला बचत गट, कासू नावेघर महिला गट, बहुजन वंचित महिला आघाडी, शब्दभेदी, शिवतेज, बेरोजगार सामाजिक संघटना तसेच भारतीय महिला फेडरेशन महाराष्ट्र इत्यादींनी इत्यादी अनेक संघटनानी सक्रिय पाठिंबा दिला आहे.
मूलभूत अधिकार संघर्ष समितीने पेण तालुका खारेपाट विभाग पाणीप्रश्नासंदर्भातील महिला आंदोलनाला जास्तीत जास्त महिला व नागरिक यांनी सहभाग देऊन आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन केले आहे. 2 मार्च पाणी प्रश्न संदर्भात महिला आंदोलनाबाबत मुख्यमंत्री, रायगड पालकमंत्री, संपर्क मंत्री, जिल्हाधिकारी यांना कळवले आहे.
