| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगर परिसरातील कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, खारघर तसेच आसपासच्या भागात गेल्या काही दिवसांपासून वारंवार व दीर्घकाळ विद्युत पुरवठा खंडित होत आहे. अनेक ठिकाणी सलग 8 ते 12 तास तर काही भागांमध्ये संपूर्ण रात्र वीजपुरवठा बंद राहण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, त्याचा सर्वाधिक परिणाम महिलांवर होत आहे. तरी महिलांना होत असलेल्या मानसिक, शारीरिक व आरोग्य विषयक त्रासाबद्दल कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षांना स्त्री शक्ती फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याच्या संस्थापक अध्यक्षा विजया कदम यांनी केली आहे. या मागणीत विजया कदम यांनी म्हटले आहे की, सध्या वाढत्या उष्णतेमुळे व दमट वातावरणामुळे नागरिक त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत वीजपुरवठा खंडित झाल्याने गर्भवती महिला, प्रसूतिपूर्व व प्रसूतीनंतरच्या माता, ज्येष्ठ नागरिक महिला, आजारी महिला तसेच लहान बालकांची काळजी घेणाऱ्या मातांना गंभीर मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने या गंभीर बाबीची स्वतःहून दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागवावा, अशी नम्र विनंती केली आहे.
महावितरणच्या कारभारावर स्त्री शक्ती आक्रमक
