मुंबई इंडियन्स अन् दिल्लीच्या सामन्याने होणार सुरूवात
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
वुमन्स प्रीमियर लीग 2024 चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे 23 फेब्रुवारीला सलामीच्या सामन्यात भिडणार असून या सामन्याने डब्ल्यूपीएलच्या दुसऱ्या हंगामाचा नारळ फुटणार आहे. डब्ल्यूपीएलचे यंदाचे सामने हे दिल्ली आणि बंगळुरू येथे होणार असून दिल्ली आणि बंगळुरूला प्रत्येकी 11 सामने होणार आहेत. दुसऱ्या हंगमाचा पहिला सामना हा बंगळुरू येथे होणार आहे, तर अंतिम सामना हा दिल्लीत होईल. हा सामना 17 मार्च रोजी होणार आहे. वुमन्स प्रीमियर लीगने दिलेल्या अधिकृत वक्तव्यानुसार यंदाच्या डब्ल्यूपीएलमध्ये सिंगल हेडर सामने होणार आहेत. सर्व सामने हे भारतीय वेळानुसार सायंकाळी 7.30 ला सुरू होतील. हंगामातील पहिले 11 सामने हे बंगळुरू येथे होतील. त्यानंतर लीगमधील उर्वरित 9 सामने आणि दोन प्ले ऑफसह अंतिम सामना हा दिल्लीत होणार आहे.
वुमन्स प्रीमियर लीगचा हा दुसरा हंगाम आहे. या हंगामाची सुरूवात गेल्या हंगामातील दोन फायनलिस्ट संघातील सामन्यान्याने होणार आहे. मुंबई इंडियन्सने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली पहिला हंगाम जिंकला होता. ते आता या हंगामात आपला खिताब वाचवण्यासाठी खेळणार आहेत. सुरूवातीला डब्ल्यूपीएलचे सामने हे आयपीएलप्रमाणेच होम अवे पद्धतीने खेळवण्याचा निर्णय झाला होता. मात्र आता ही स्पर्धा फक्त दोन शहरात होणार आहे. बंगळुरूमधील सामने हे एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहेत. याचप्रमाणे दिल्लीतील सामने हे अरूण जेटली स्टेडियममध्ये होणार आहेत.