महिला संरक्षण कार्यक्रम संपन्न

। अलिबाग । वार्ताहर ।

अंतर्गत तक्रार निवारण कमिटी, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग तसेच महिला सक्षमीकरण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग तालुक्यातील चोंढी-किहीम येथील लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाच्या वरिष्ठ महाविद्यालयात शुक्रवारी (दि.20) महिला सुरक्षितता या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमात अ‍ॅड. निहा राऊत तसेच तपस्वी गोंधळी यांची व्याख्यात्या म्हणून प्रमुख उपस्थिती लाभली होती.

कार्यक्रमात अ‍ॅड. निहा राऊत तसेच प्रशिक्षणार्थी म्हणून तपस्वी गोंधळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अ‍ॅड. निहा राऊत यांनी मुलींना आपले राहणीमान कसे असावे, सोशल मीडियाचा अतिवापर कसा धोकादायक आहे, हे उत्तमरीत्या समजावून सांगितले. तसेच, एखादा अनैतिक प्रसंग ओढावल्यास कसे स्वसंरक्षण करावे याचे उत्तम मार्गदर्शन केले. कायद्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी कोणते कायदे करण्यात आले आहेत, आपण त्या सुविधांचा उपयोग कशाप्रकारे करू शकतो याचे मार्गदर्शन देखील केले. पुढे तपस्वी गोंधळी यांनी मुलींना स्वसंरक्षण कसे करावे, याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. स्वसंरक्षण ही काळाची गरज आहे, आपण सतर्क राहणे कसे गरजेचे आहे, याचे उत्तम मार्गदर्शन त्यांनी केले.

हा कार्यक्रम राबविण्यासाठी लिना पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे नियोजन अंतर्गत तक्रार निवारण कमिटी समन्वयक हर्षदा पुनकर, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग समन्वयक प्रितीजा राऊळ तसेच महिला सक्षमीकरण कक्ष समन्वयक राजश्री कदम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थिनी विनश्री भगत हिने केले.

Exit mobile version