पावसाळ्यापूर्वीच्या बेगमीसाठी महिलांची धावपळ

| तळा | वार्ताहर |

अवघ्या महिन्यावर पावसाळा येऊन ठेपला असल्याने तळा बाजारपेठेत पावसाळ्यापूर्वी बेगमीसाठी महिलावर्गाची लगबग सुरू झाली आहे. यासाठी तळा बाजारपेठेत बारीक सुकट, अंबाडी सुकट, बोंबील, वाकटी, म्हाकल्या आदी सुकी मच्छी खरेदी करताना महिला पहायला मिळत आहेत.

पावसाळ्यात ताजी सुकी मच्छी मिळणे कठीण असते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच गृहिणी सुकी मच्छी खरेदी करून तिला दोन ते तीन वेळा उन्हात वाळवून बरणीमध्ये भरून ठेवतात. पावसाळ्यात आवश्यकतेनुसार वापरासाठी काढतात. यासह पावसाळ्यात लागणारे चवळी, वाल, मूग, मटकी, हरभरा ही कडधान्यदेखील खरेदी केली जात आहेत. तालुक्यातील गिरणे व नानवली येथील वाल, मूग, मटकी व चवळीला मोठी मागणी असते. उन्हाळी अगोटीला गावागावांत पापड, फेण्या, शेवया, विविध प्रकारचे लोणचे, मसाले यांसारखे वाळवणीचे पदार्थ सामूहिक व वैयक्तिकपणे केले जातात. रायगड जिल्ह्यात आजही अनेक गावांमध्ये वाळवण संस्कृती जोपासली जात आहे. गावागावांत आजही महिला पापड, फेण्या, शेवया, लोणची आदी पदार्थ तयार करण्यासाठी एकत्र जमतात. पूर्वापार चालत आलेली बेगमी व वाळवणीची संस्कृती आजही कायम जपली जात आहे.

Exit mobile version